‘ईडी’ची भीती दाखवणाऱ्या भाजपला कोल्हापूरकरांनी जागा दाखवली : नाना पटोले | पुढारी

'ईडी'ची भीती दाखवणाऱ्या भाजपला कोल्हापूरकरांनी जागा दाखवली : नाना पटोले

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. त्‍यांचा हा विजय महाराष्ट्र व देशाला दिशा देणारा ठरणार आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीला धार्मिक रंग देणा-या व जनतेला ‘ईडी’ची भीती दाखवणाऱ्या भाजपला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीतील स्वाभिमानी जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी आज व्‍यक्‍त केले.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्‍हणाले, ” कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी आहे. सामाजिक समतेच्या या भूमीत जाती धर्माचे विष कालवण्याचा कोणाचाही प्रयत्न यशस्वी होत नाही. तकोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण करून मतांचा जोगवा मागण्याचा प्रयत्न केला होता; परंतु कोल्हापुरच्या स्वाभिमानी जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करून जातीय द्वेष पसरवणाऱ्यांना चपराक दिली आहे. आजच्या या विजयाने पुरोगामी महाराष्ट्र कोणत्या दिशेने जाणार हेच दाखवून दिले आहे.” या विजयाबद्दल नाना पटोले यांनी कोल्हापूरच्या जनतेचे आभारही त्‍यांनी मानले आहेत.

देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड  वाढली आहे, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न असे अनेक   ज्वलंत प्रश्न देशात भेडसावत असताना केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजपाने धार्मिक मुद्दे पुढे केले होते; परंतु महाविकास आघाडीच्या सरकारने केलेले काम व महाविकास आघाडीची ताकद यामुळे हा विजय झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामावर या विजयाने शिक्कामोर्तब केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  कोल्हापूरातून पलायन केले. कोल्हापुरात पराभव झाला तर हिमालयात जाऊ, असेही ते म्हणाले होते. आता त्यांनी पुण्यातून हिमालयात पलायन करावे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

कोल्हापूरच्या जनतेने दिलेला निकाल हा काँग्रेस पक्षाला उर्जा देणारा असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे, असे नाना पटोले म्‍हणाले. सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला.

हेही वाचलं का ? 

Back to top button