सातारा : आता कास पठारावर अनुभवता येणार 'नाईट जंगल सफारी' | पुढारी

सातारा : आता कास पठारावर अनुभवता येणार 'नाईट जंगल सफारी'

बामणोली (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
जगभरातील पर्यटकांना भुरळ घातलेल्या जागतिक वारसा स्थळ कास पठारावर पावसाळ्यानंतर विविध रंगीबेरंगी फुलांचे गालिचे तयार होतात. ही हंगाम फुले पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक याठीकाणी भेट देतात. हे पर्यटन हंगामापुरते मर्यादित न राहता, ते पठार व परिसरात फिरायला यावेत व त्यातून स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी, या हेतूने नाईट जंगल सफारी सुरू करण्यात येणार आहे. सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या संकल्पनेतून सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाणार आहे.

कास पठार व परिसरातील पर्यटन हे हंगामी न राहता, ते बारमाही रहावे आणि पर्यटन वाढीस लागावे, या हेतूने मंगळवारपासून (दि.१९) नाईट जंगल सफारीचा हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ताडोबा अभयारण्याच्या धर्तीवर कास पठार व परिसरातील ५० किमी अंतरावर नाईट जंगल सफारी करण्याचे कास पठार कार्यकारी समिती व सातारा वनविभाग यांनी निश्चित केले आहे.

या नव्याने सुरू केलेल्या उपक्रमासाठी समितीकडून दोन सुसज्ज गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. याचा मार्ग कास पुष्प पठार – घाटाई फाटा – घाटाई देवी मंदिर – वांजुळवाडी – कास तलाव – कास मंदिराच्या पुढील बाजूने तांबी फाटा -पाली, तांबी – धावली – जुंगटी – कात्रेवाडी – परत तांबी फाटा – अंधारी – कोळघर – सह्याद्रीनगर – चिकनवाडी – मोळेश्वर – एकीव – पारंबे फाटा परत कास पुष्प पठार असा ५० किमीचा हा मार्ग आहे. यामध्ये एकूण ३ तासाची जंगल सफरी असणार आहे.

यामध्ये जंगल सफारीसह रात्रगस्त देखील असणार आहे. कात्रेवाडी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या जंगल टॉवर वरून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलाचे व शिवसागर जलाशयाचे दर्शनही घेता येणार आहे. या जंगल सफारीत बिबट्या,अस्वल, सांबार, डुक्कर, रानटी कुत्रे, साळिंदर,भेकर,पिसोरी,रानगवे, खवले मांजर, कोल्हा, ससा,रानकोंबडी या वन्यप्राण्यासह सरपटणारे प्राणी यांचे देखील पर्यटकांना दर्शन घडू शकते.

जंगल सफारीच्या ऑलाइन बुकिंग सुविधा कास पठाराच्या www.kas.ind.in या वेबसाईटवर करता येणार आहे. रात्री ७ नंतर जंगल सफारी सुरू करण्यात येणार असून, पर्यटकांचा प्रतिसाद पाहून नंतर यामध्ये बदल करण्यात येणार आहे. कास पुष्प पठार व परिसरातील जैविविधतेचे रक्षण करण्याबरोरच पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कास पठार कार्यकारी समिती कायमस्वरूपी काम करत आहे. यातून शेकडो स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. जंगल सफारीच्या उपक्रमातून आणखी तरुणांना यामधून रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली.

हेही वाचलंत का ?

Back to top button