समाज परिवर्तनाचे महानायक | पुढारी

समाज परिवर्तनाचे महानायक

सामाजिक समतेसाठी विषमतेविरुद्ध आणि सामाजिक न्यायासाठी अन्यायाविरुद्ध युद्ध लढणारे योद्धा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण समजून घेतले पाहिजे. आज डॉ. आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्त…

शतकानुशतके वंचित असलेल्या समाजाला अस्मितेची ओळख देण्याचे आणि त्याचबरोबर समतेवर आधारित नवसमाजाचे स्वप्न पाहण्याचे आत्मभान भारतीय समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच निर्माण झाले. समाज परिवर्तनासाठी चाललेल्या सामाजिक युद्धाचे ते महानायक होते. भारतातील समाजव्यवस्था सर्वंकष बदलून नवीन व्यवस्था देशाला देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. अस्पृश्यता आणि जातीव्यवस्था यांच्यामुळे निर्माण झालेल्या अंधकारात खितपत पडलेल्या लोकांसाठी क्रांतिसूर्याचा उदय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवितकार्य होय.

फक्त दलित शोषितच नव्हे, तर अखिल मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने आणि बहुक्षेत्रीय कार्याने भारतीय माणसाच्या जीवनातील विविध क्षेत्रांसाठी त्यांनी योगदान दिले. माणसाला माणुसकीने वागविले गेले पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक लढे दिले. सर्वच माणसांना समतेने वागविले पाहिजे, यासाठी त्यांनी आपला विचार संविधानसभेत प्रभावीपणे मांडला. दलित, शोषित, स्त्रिया, शेतकरी, कामगार, भटके विमुक्त, आलुतेदार, बलुतेदार यांच्या हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून लढा दिला. सामाजिक समतेसाठी, विषमतेविरुद्ध आणि सामाजिक न्यायासाठी, अन्यायाविरुद्ध युद्ध लढणारे योद्धा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण समजून घेतले पाहिजे.

अस्पृश्यांना मूलभूत मानवी हक्क नाकारले गेले होते. यासाठी त्यांनी संघर्ष केला. महाडचा सत्याग्रह (20 मार्च 1927), मनुस्मृती दहन (25 डिसेंबर 1927), काळाराम मंदिर सत्याग्रह (2 मार्च 1930) अशी अनेक लोकचळवळीची आंदोलने बाबासाहेबांनी घडवून आणली. यातून दुहेरी रणनीती राबविली. लोकांना अस्पृश्यतेच्या विरोधात जागे केले आणि इंग्रजी सत्तेला या प्रश्नांची तीव्रता दाखवून देणे हा त्यांचा उद्देश होता. अस्पृश्यांबरोबरच जे जे वंचित आहेत, त्यांनाही त्यांचा हक्क आणि त्यांचे योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी व्यापक भूमिका त्यांनी घेतलेली दिसून येते. इतिहासातील सर्वात मोठ्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. आंबेडकरांनी केले होते. भारतीय शेतीच्या प्रश्नांवर त्यांचे मूलभूत चिंतन होते. ‘भारतातील लहान धारण क्षेत्रे आणि त्यावरील उपाय’ या लेखामध्ये त्यांनी शेती प्रश्नासंदर्भात मूलभूत भाष्य केले आहे. शेती हा शासकीय उद्योग असावा, असे त्यांचे मत होते.

‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ आणि ‘प्रबुद्ध भारत’ अशा वृत्तपत्रांमधून शोषितांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी आवाज उठविला. त्यांची पत्रकारिता परखड व मानवी समाजाला दिशा देणारी ठरली. स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडेरेशन या पक्षांच्या माध्यमातून शोषितांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढली गेली. सर्वसमावेशक अशा लोकसत्ताक तत्त्वावर आधारलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते.

नवभारताच्या उभारणीसाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी पार पाडलेली कामगिरी जगाच्या इतिहासात अविस्मरणीय आहे. दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस सतत अभ्यास आणि चर्चा करून जगातील उत्तम असे संविधान निर्माण करण्यात आले. त्यामध्ये त्यांचा वाटा सिंहाचा होता, हे कोणालाही नाकारता येणार नाही. हिंदू कोड बिल आणि संविधानातील तरतुदी यांच्या माध्यमातून स्त्रियांच्या हक्कांचे ते उद्गातेच ठरतात. स्त्रियांची गुलामगिरी ही जातीव्यवस्थेशीही निगडीत असल्याचा त्यांचा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. स्त्रियांच्या हक्कांसाठी व ओबीसींच्या हक्कांसाठी कायदेमंत्रिपदाचा राजीनामा देणारा डॉ. आंबेडकरांसारखा नेता विरळाच!

डॉ. आंबेडकरांनी अर्थशास्त्रावर मुख्य तीन ग्रंथ लिहिले. ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी’, ‘इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’ आणि ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी : इटस् ओरिजिन अँड सोल्युशन’ हे तीन ग्रंथ त्यांच्या अनुक्रमे एम. ए., पीएच. डी. आणि डॉक्टर ऑफ सायन्स या तीन पदव्यांसाठी लिहिलेले प्रबंध होते. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ते लिहिलेले आहेत. ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’मध्ये जातीचे अर्थशास्त्र; ‘व्हॉट काँग्रेस अँड गांधी डिड टू अनटचेबल्स’ या ग्रंथामध्ये अस्पृश्यतेचे अर्थकारण, तर ‘बुद्धिझम अँड कम्युनिझम’ यातील राज्यसंस्था आणि समाजरचना यांचे राजकीय अर्थशास्त्रीय विश्लेषण हे त्यांचे लेखन त्यांनी ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या स्थायी भावाने केले असले, तरी त्यांचे अर्थशास्त्रीय लेखन हे सर्व देशाला समोर ठेवून व्यापक अर्थाने केल्याचे दिसून येते.

समाजरचना, राज्यसंस्था, शासनव्यवस्था, लोकशाही, कायदे, संविधानशास्त्र, शिक्षण, शेती, कामगार, विद्यार्थी, शिक्षण अशा अनेकविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. व्याख्याने दिली आहेत. अपरिमित स्वातंत्र्य समतेचा नाश करते. त्यामुळे स्वातंत्र्य अबाधित राखून समता निर्माण केली पाहिजे, असे त्यांना वाटते. हुकूमशाही नाकारणारा शासकीय समाजवाद त्यांना अभिप्रेत होता. ‘रक्ताचा एकही थेंब न सांडता मूलभूत परिवर्तन घडविणारी राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही’ अशी लोकशाहीची व्याख्या डॉ. आंबेडकर यांनी केली आहे. हे त्यांचे लोकशाही विचाराला मूलभूत योगदान होय. समाजकारण, धर्मकारण, राजकारण आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले असले, तरी ते मुळात अर्थतज्ज्ञ होते. त्यांचे समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, वाणिज्य अशा विविध विषयांचे ज्ञान प्रेरणादायक आहे. विधिमंडळ, संविधान सभा, संसद अशा सर्वच सभागृहांत त्यांनी केलेली भाषणे, दिलेले दाखले व स्पष्टीकरण ज्ञानाने ओतप्रोत भरलेले दिसून येतात.

डॉ. आंबेडकरांनी जे शिक्षण घेतले, ते फक्त पदव्या मिळवण्यासाठी नाही, तर त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या व्यापक हितासाठी करून दिला. विविध ज्ञानशाखांमध्ये लीलया विहार करणारे डॉ. आंबेडकर प्रत्येक प्रश्नाचे, समस्येचे तार्किक विश्लेषण करताना दिसतात आणि शास्त्रीयद़ृष्ट्या स्पष्टीकरण करतात. त्यामुळे आपला मुद्दा पटवून देणे आणि सार्वत्रिक हितास्तव तो मान्य करून घेणे त्यांना शक्य झाले. बुद्धीकौशल्याचा आणि त्यांच्या विशाल प्रज्ञेचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या जीवनकार्यात पदोपदी येतो.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित समाजाची निर्मिती झाली पाहिजे, यासाठी केलेला अविरत संघर्ष यशस्वी झाला. यामागे जसे त्यांचे अथक परिश्रम होते, तसेच प्रचंड ज्ञानाचे आणि अचाट पांडित्याचे उपयोजन त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. मानवमुक्तीच्या लढ्याच्या योद्ध्याचे ज्ञान हेच शस्त्र ठरले आणि त्यासाठीच जगाने त्यांना ज्ञानाचे प्रतीक (डूालेश्र ेष घपेुश्रशवसश) म्हटले आहे. या अनन्य ज्ञानसूर्यास विनम्र अभिवादन!
– प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन

Back to top button