कोल्‍हापूर : राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी के.पी, ए.वाय सक्रिय! | पुढारी

कोल्‍हापूर : राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी के.पी, ए.वाय सक्रिय!

गुडाळ, आशिष पाटील : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडले आहेत. यानंतर त्‍यांनी संभाव्य राज्यपाल नियुक्त आमदार पदाच्या यादीतून आपले नाव वगळावे, असे राज्‍सपालांना भेटून सांगितले. यानंतर कोल्‍हापूर जिल्ह्यातून या जागेवर दावा सांगण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे मेव्हणे – पाहुणे पुन्हा सक्रिय झाले आहेत.

दरम्यान, उत्तरच्या पोट निवडणूक निकाल लागला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ना. हसन मुश्रीफ यांना राधानगरी – भुदरगडमधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळ भेटीसाठी हालचाली सुरू केल्‍या आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मुदाळतिट्टा येथील प्रचार मेळाव्यात शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली होती. त्‍यावेळी ए. वाय. पाटील यांना राज्यपातळीवर संधी देऊन सन्मान करू, असे पवार यांनी जाहीर केले होते. आता राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. आता राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी ए. वाय. पाटील यांचे शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतली. त्‍याच दरम्यान माजी आमदार के. पी. पाटील समर्थकांनीही शरद पवार आणि ना. जयंत पाटील यांची भेट घेऊन विधानपरिषदेवर दावा सांगितला होता.

दरम्‍यान, मेहुण्या- पाहुण्यांच्या या संघर्षात दोन्ही नावे बाजूला ठेवण्यात आली आहेत. आता राष्ट्रवादी कोट्यातून महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नावाचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तथापि राज्यपालांच्या मंजुरी अभावी या नियुक्त्या अद्यापही रखडलेल्या आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकताच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यानंतर राज्यपालांना भेटून विधानपरिषद नियुक्तीच्या यादीमधून आपले नाव वगळण्याचे राजू शेट्टी सूचित करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामूळे आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषद आमदार होण्यासाठी के. पी. आणि ए. वाय. या मेहुण्या- पाहुण्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

राधानगरी – भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दुसर्‍या टर्ममध्ये मतदारसंघाची बांधणी आणखी मजबूत केली आहे. गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समिती आदी संस्थावर आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची वर्णी लावून कार्यकर्त्यांचे जाळे भक्कम केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार आबिटकर यांना आव्हान देणे तितकेसे सोपे नाही. हे के. पी. आणि ए. वाय. या मेव्हण्या पाहुण्यांनी जाणले आहे. त्यामुळे विधान परिषदेवर जाऊन आमदार होणे त्यांना अधिक सोयीचे आहे. म्हणूनच दोघांनीही राज्यपाल नियुक्त कोट्यात समावेश होण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत.असे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा  

Back to top button