अमरावती : आमदार रवी राणांची 2.25 तास चौकशी | पुढारी

अमरावती : आमदार रवी राणांची 2.25 तास चौकशी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेक करीत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात आमदार रवी राणा यांची सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात पेशी झाली. एसीपी भारत गायकवाड यांनी 2 तास 25 मिनीटांपर्यंत आमदार राणांची चौकशी केली. त्यामध्ये घटनेबाबत 60 पेक्षा अधिक प्रश्नांची सरबत्ती राणांवर करण्यात आले. राणांच्या पेशी करिता सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. तर या संपूर्ण परिसरात कलम 144 लागू करीत 4 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित होण्यास मनाई केली होती.

एसीपी कार्यालय बनले पोलीस छावनी

मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर 9 फेब्रुवारी 2022 रोजी शाई फेक करीत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात अटकपूर्व जमानत मिळाल्यानंतर 2 वेळा नोटीस बजावल्यानंतर देखील आमदार राणा पोलिसांसमोर हजर झाले नाहीत. 7 एप्रिल गुरूवारी दुपारी 1.15 वाजता आमदार राणा त्यांचे वकील ॲड. दीप मिश्रा यांच्यासह शहर कोतवाली ठाणे परिसरात असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हजर झाले. यावेळी संपूर्ण परिसरात कलम 144 लागू करण्यात आले. तर कार्यकर्ता, समर्थकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध लावण्यात आले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी वकील ॲड. दीप मिश्रा यांच्या समक्ष आमदार राणा यांना प्रश्न केले.

60 पेक्षा अधिक प्रश्नांची विचारणा

दरम्‍यान, राणा यांनी विचारण्यात आलेल्या 60 पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रश्नांमध्ये आयुक्त आष्टीकर यांच्याशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे. आष्टीकर यांच्यासोबत व्यक्तीगत शत्रूता आहे का, आष्टीकर यांची किती वेळा भेट घेतली. 9 फेब्रुवारीचा संपूर्ण घटनाक्रम माहिती करुन घेतला. त्यांच्या भ्रमणध्वनीवर किती कॉल आले. कोणकोणत्या नागरिकांचे कॉल आले. 9 फेब्रुवारीला कोठे होते, त्यांनी कोण कोणत्या नागरिकांसोबत चर्चा केली. संपूर्ण कॉल डिटेल्सची माहिती घेतली. आमदार राणा यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. या प्राणघातक हल्ला प्रकरणाशी त्यांचा कोणताच संबंध नाही. शाई फेकण्याच्या घटनेचा निषेध करीत असे कृत्य चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. अश्या प्रकारे तब्बल 2 तास 25 मिनिटांपर्यंत राणांची पोलीस चौकशी सुरू होती.

हेही वाचा  

Back to top button