ठाणे : राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांचा रेड सिग्नल कायम; पोलिसांनी सुचवला 'हा' उपाय | पुढारी

ठाणे : राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांचा रेड सिग्नल कायम; पोलिसांनी सुचवला 'हा' उपाय

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्षांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार आणि हनुमान चालिसा आदी विविध मुद्यांवर आपली भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात 9 एप्रिलला होणाऱ्या मनसेच्या जाहीर सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोर असलेल्या रस्त्यावर सभा घेण्यास पोलिसांनी बुधवारी परवानगी नाकारली होती.

त्यानंतर गुरुवारी दिवसभर सभेच्या परवानगी आणि जागेचा विषय पोलीस दप्तरी रेंगाळत राहिला. पोलिसांनी पर्यायी जागेवर सभा घ्या, असा उपाय मनसेच्या स्थानिक नेत्यांना सुचवल्यानंतर ही सभा राम मारुती रस्त्यावरील गजानन महाराज मठ चौकात घेण्याची भूमिका मनसेकडून घेण्यात आली. मात्र, हा परिसर रहिवाशी क्षेत्र असल्याकारणाने पडताळणी अंती येथे देखील सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली.

मनसेच्या शनिवारी होणाऱ्या सभेसाठी गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावरच सभा घेण्याबाबत मनसेचे नेते गुरुवारी देखील ठाम होते. गुरुवारी सकाळी मनसेच्या काही नेत्यांनी ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही सभा गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर घेण्याचा आग्रह केला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी एक बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत राम मारुती रस्त्यावरील गजानन महाराज मठ चौकातील जागेवर सभेस परवानगी देण्यात यावी का यावर विचारविनिमय करण्यात आला.

मात्र, गजानन महाराज चौक परिसर रहिवाशी क्षेत्र असल्याने येथे देखील सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी मनसे नेत्यांनी पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गडकरी रंगायतन समोरच सभा घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र, या सभेला गर्दी होण्याची शक्यता असून गडकरी रंगायतन समोरील रस्ता रहदारीचा मार्ग आहे. त्यातच ही सभा शनिवारी होत असल्याने विकएन्ड निमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल.

या कारणास्तव पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी होणाऱ्या सभेस रेड सिग्नल कायम ठेवला. दरम्यान, ठाणे पोलिसांनी थेट राज ठाकरे यांना फोन करून सभेची जागा आणि तारीख बदलण्याची विनंती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही सभा 12 तारखेला ठाणे महापालिका मुख्यालयासमोर घेण्यात यावी अशी विनंती ठाणे पोलिसांनी राज ठाकरे यांना केली असल्याचे कळते. त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

Back to top button