नाशिक : वीज पडून पती-पत्नीचा मृत्यू | पुढारी

नाशिक : वीज पडून पती-पत्नीचा मृत्यू

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथे वीज पडून मालुंजे येथील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत या दाम्पत्याच्या दोन मुली व अन्य एक युवक असे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

दशरथ दामू लोते (35), सुनीता लोते (30, दोघे रा. मालुंजे, ता. इगतपुरी) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघे आपल्या दोन मुलींसह गिर्‍हेवाडी येथे एका विवाहासाठी आले होते. तेथून परतत असताना रस्त्यात वादळी पाऊस आल्याने ते पिंपळगाव घाडगा येथे गोपाळ किसन देवगिरे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली थांबले. तेथे अन्य तिघे जणही होते. मात्र, दुर्दैवाने या झाडावरच वीज पडल्याने लोते दाम्पत्य जागीच ठार झाले, तर त्यांच्या मुली तेजस्विनी लोते (7), सोनाली लोते (5) या दोघी व गिर्‍हेवाडी येथील युवक बाळू चंदर गिर्‍हे (20) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर धामणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी पुढील कार्यवाही सुरू केली. वाडीवर्‍हेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा केला.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी तहसीलदार कासुळे यांच्याकडे केली.

हेही वाचा :

Back to top button