मुंबईला बसणार वीजदरवाढीचा शॉक | पुढारी

मुंबईला बसणार वीजदरवाढीचा शॉक

मुंबई ; पुढारी डेस्क : महाराष्ट्र वीज नियामक आयोग नवीन नियामक आराखडा आणणार असून या आराखड्याची अंमलबजावणी झाली तर येणार्‍या काळात मुंबईकरांचे वीजबिल वाढण्याची शक्यता आहे.

बेस्ट, टाटा पॉवर, अदानी आणि एमईडीसीएलसारख्या वीज कंपन्यांच्या वाढत्या दैनंदिन भांडवली खर्चापोटी भांडवली गुंतवणुकीची गरज असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा नवा आराखडा नियामक आयोगाने तयार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरांमध्ये भूमिगत वीजवाहिन्यांच्या देखभालीसाठी किंवा त्या नव्याने टाकण्यासाठी वीज पुरवठा कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च होण्याची शक्यता आहे. यातील 50 टक्के खर्च सरळ ग्राहकांच्या वीजबिलातून वसूल करण्याचा प्रस्ताव नव्या आराखड्यात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, ग्राहकांच्या सूचना आणि हरकतींसाठी नवा आराखडा खुला करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र वीज नियामक आयोगातील सूत्रांनी दिली आहे.

विजेची वाढती मागणी आणि टंचाईमुळे कोळसा महाग झाल्याने इंधन समायोजन आकार म्हणून शुल्कवाढ होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका बेस्ट आणि टाटाच्या सुमारे 18 लाख ग्राहकांना बसू शकतो.

मुंबईत औष्णिकसह 180 मेगावॅट वायू, 440 मेगावॅट जलविद्युत आणि 350 मेगावॅट वीज हरीत ऊर्जा स्रोतांकडून पुरवली जात आहे. या माध्यमातून वीजदरवाढ टाळण्याचा प्रयत्न असल्याचे टाटा पॉवरने म्हटले असले तरी संपूर्ण मुंबईचा वीजपुरवठा टाटाकडे नाही.

Back to top button