कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : राजकीय संघर्ष निर्णायक वळणावर

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : राजकीय संघर्ष निर्णायक वळणावर
Published on
Updated on

कोल्हापूर; सतीश सरीकर : कोल्हापूर शहरात केवळ पोटनिवडणुकीचीच चर्चा सुरू असून, रणधुमाळी माजली आहे. सोशल मीडियासह कोपरा सभा, जाहीर सभा आणि प्रचार फेर्‍यांनी अक्षरशः धुरळा उडवला आहे. विविध पक्षांची राज्यातील मातब्बर नेतेमंडळी कोल्हापूर वार्‍या करत आहेत. जिंकण्याच्या ईर्ष्येतून आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे. मतदानासाठी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत दिवस उरल्याने राजकारणाने टोक गाठले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यात 'हाय व्होल्टेज' लढत होत आहे. कोल्हापूर उत्तरच्या गुलालासाठी निर्णायक संघर्ष सुरू आहे.

काँग्रेसचे आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. बिनविरोधसाठी प्रयत्न झालेल्या या पोटनिवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. 15 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढाई महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांनीही कोल्हापुरात ठाण मांडले आहे. त्यांच्या मदतीला राज्यातील दिग्गज नेतेमंडळी येत आहेत. एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले जात आहेत. भानगडी बाहेर काढण्याचे इशारे दिले जात आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभेत दगडफेक झाल्याने कोल्हापूर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. अगदी वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे. कार्यकर्त्यांची फौजही त्यांच्या दिमतीला आहे. महाविकास आघाडी व भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आणखी मंत्री, आमदारही कोल्हापूर उत्तरच्या मैदानात प्रचाराचा धुरळा उडविण्यासाठी येणार आहेत. परिणामी कोल्हापूरचे राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.

साम, दाम, दंड, भेद अन् जेवणावळी

महाविकास आघाडी व भाजपसाठी कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिंकायचेच..! या ईर्ष्येने दोन्ही पक्षांची नेतेमंडळी रिंगणात उतरली आहेत. प्रसंगी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला जात असल्याचा आरोप एकमेकांवर केला जात आहे. जेवणावळींचा तर अक्षरशः फडशा पाडला जात असल्याचे वास्तव आहे. त्यासाठी मंगल कार्यालयांसह काही हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांचा रात्रंदिवस राबता सुरू आहे. सिनेमाची शोसुद्धा बुक केल्याचे सांगण्यात येते.

सोशल मीडिया अन् कटिंग-पेस्टिंग

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यातही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. महाविकास आघाडी व भाजपकडून त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा जोरात राबविण्यात येत आहे. परंतु; त्यातही काही उत्साही कार्यकर्ते जुने व्हिडीओ, क्लीप काढून त्याचे कटिंग-पेस्टिंग करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news