सायकलवर गस्त घाला…! ; पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे आदेश | पुढारी

सायकलवर गस्त घाला...! ; पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे आदेश

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात पोलिसांचा वावर दिसावा, तसेच पोलिसांची तब्बेत तंदुरूस्त राहावी यासाठी सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सायकलचे वाटप कऱण्यात आले आहे.

मात्र, वापराअभावी या सायकली  धूळखात पडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी पुन्हा सायकलवर गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलिसांची प्रकृती उत्तम राहावी यासाठी पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांच्याकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

पोलिसांच्या प्रकृतीची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक पोलिसांला डिजिटल वॉच देण्यात आले आहे. या वॉचवरून पोलिसांचा रक्‍तदाब, ऑक्‍सिजनचे प्रमाण, ताप, ह्रदयाचे ठोके इत्यादीबाबत माहिती मिळते.

शाहबाज शरीफ बनू शकतात पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

तसेच याच घड्याळाचा वापर करीत पोलिसांच्या तंदुरूस्तीसाठी नुकतेच चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी बक्षिस देखील जाहीर केली आहेत.

काही महिन्यांपूर्वी पोलिसांना सायकलींचे वाटपही केले आहे. मात्र, या सायकलला मडगार्ड नसल्याने पावसाळ्यात या सायकल पोलिसांनी अडगळीत ठेवून दिल्या. हिवाळ्यातही या सायकल गस्तीसाठी बाहेर काढल्या नाहीत.

याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी बिनतारी संदेशवरून सर्व पोलीस ठाण्यांना सायकलवरून गस्त घालण्याचे आदेश दिले.

शिरपूर : सेवानिवृत्तीच्या दिवशीच लाच प्रकरणी BDO च्या हाताला ठोकल्या बेड्या 

सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत दिवसपाळीतील कर्मचारी सायकलवरून गस्त घालतील. तसेच रात्रपाळीसाठी आलेले कर्मचारी आठ ते दहा वाजेपर्यंत गस्त घालतील.

याशिवाय पहाटे चार ते सहा वाजताच्या दरम्यान पोलिसांचे “गुड मॉर्निंग’ पथकही सायकलवरून परिसरात गस्त घालतील, असे आदेश पोलीस आयुक्‍तांनी दिले.

यामुळे पहाटेच्यावेळी होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्‍वासही त्यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्‍त केला. तसेच, ज्या पोलीस ठाण्यांकडून सायकलवरून गस्त घालण्यात येणार नाही त्यांच्याकडून खुलासा घेतला जाईल, असेही पोलीस आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

Back to top button