जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांना मदत करणा-या पत्रकाराचा भारतीय सुरक्षा दलाकडून खात्मा | पुढारी

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांना मदत करणा-या पत्रकाराचा भारतीय सुरक्षा दलाकडून खात्मा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्रकारितेच्या नावाखाली दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका पत्रकाराचा सुरक्षा दलातील जवानांनी खात्मा केला. मंगळवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले. पोलिसांच्या माहितीनुसार या दोन दहशतवाद्यांपैकी एक रईस अहमद भट नावाचा व्यक्ती होता. तो पूर्वी पत्रकारिता करत होता. तो ‘व्हॅली न्यूज सर्व्हिस’ ऑनलाईन न्यूज पोर्टल चालवत होता. (जम्मू-काश्मीर)

यापूर्वीच दहशतवादी घटनांशी संबंधित दोन एफआयआर रईस अहमद भट याच्यावर दाखल करण्यात आल्या होत्या. काश्मीर झोन पोलिसांनी भटचे ओळखपत्र जारी केलेले आहे. दुसरा ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव हिलाल अह राहा आहे. तो बिजबेहारा येथील रहिवासी आहे. त्याचबरोबर तो ‘सी’ दर्जाचा दहशतवादी होता, अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती.

श्रीनगरच्या रैनावरी भागात ही चकमक झाली. येथे काही दहशतवादी लपले आहेत. ते काहीतरी गडबड करण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. काश्मीर झोनचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, “ठार झालेले दोन्ही दहशतवादी अनेक घटनांमध्ये सामील होते. त्यांनी अनेक निष्पाप नागरिकांची हत्याही केली होती.” (जम्मू-काश्मीर)

चकमक झाल्यानंतर सुरक्षा दलांना घटनास्थळावरून दारुगोळ्यासह आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत. भट हा दहशतवादी संघटना लष्करशी संबंधित होता. माध्यमांच्या ओळखपत्राचा तो गैरवापर करायचा. सुरक्षा दलाच्या यादीत भटला दहशतवाद्यांच्या ‘सी’ श्रेणीत ठेवण्यात आले होते. ही चकमक घाटी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त मोहिमेचा भाग होती. रईस गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि आता तो एका चकमकीत मारला गेला आहे.

Back to top button