बीड : घराला लागली आग, बहीण, मुलांना वाचवताना तरुणाचा मृत्यू | पुढारी

बीड : घराला लागली आग, बहीण, मुलांना वाचवताना तरुणाचा मृत्यू

धारूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपरवाडा येथे शेतवस्तीवरील दोन घरांना अचानक आग लागली. यावेळी आग विझवत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये रवी श्रीहरी तिडके (वय २१) हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू  झाला. ही दुर्घटना आज (मंगळवार) दुपारी घडली.

तालुक्यातील पिंपरवाडा गावापासून अर्धा किमी अंतरावर उत्तरेस श्रीहरी कारभारी तिडके व रामकिसन कारभारी तिडके यांचे शेतात पत्राचे शेड व गोठा आहे. या गोठ्यास दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी घरातील बहीण व लहान मुलांना बाहेर काढून आग विझवण्यासाठी श्रीहरी तिडके यांचा मुलगा रवी तिडके गेला. रवी टाकीतील पाणी घेऊन आग विझवत असताना अचानक घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात सिलिंडरचा पत्रा रवीच्या मानेला लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यात त्याचा जागीच मृत्यू (death) झाला.

याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button