नाशिक : सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या ; पँटच्या खिशात सापडली सुसाइड नोट | पुढारी

नाशिक : सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या ; पँटच्या खिशात सापडली सुसाइड नोट

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
व्याजाच्या रकमेसाठी तिघा खासगी सावकारांनी सतत लावलेला तगादा, घरी येऊन नेहमी केली जाणारी अर्वाच्च शिवीगाळ, व्याज देत नाही म्हणून थेट ट्रक ताब्यात घेऊन चारपाच जणांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून पंचवटीतील एका ट्रक ड्रायव्हरने विष प्राशन करून आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिलीप दयाराम रौंदळ (४०, तलाठी कॉलनी, तारवालानगर, दिंडोरीरोड, पंचवटी) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी मयत रौंदळ यांची मुलगी प्रणाली रौंदळ हिच्या फिर्यादीवरून तिघा संशयितांवर आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. तर दोघे संशयित फरार आहेत.

याप्रकरणी आडगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मयत दिलीप रौंदळ हे ट्रक ड्रायव्हर असून, त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अरूण बोधले, विजय लहामगे, चंन्द्रेश लोढया (रा. तिघे नाशिक) या संशयितांकडून अनुक्रमे १ लाख, ३ लाख आणि २ लाख ४० हजार असे सहा लाख ४० हजार रुपये व्याजाने घेतलेले होते. ट्रकचा अपघात झाल्याने त्यांना व्याजाची रक्कम देणे शक्य नव्हते. मात्र संबंधित संशयितांकडून व्याजाच्या रक्कमेसाठी वारंवार तगादा सुरू होता. अशातच दि.१६ मार्च रोजी संशयितांनी त्यांना फोनकरून औरंगाबाद रोडवरील खुशाल ट्रान्सपोर्ट जवळ बोलावून घेतले. तेथे त्यांना शिवीगाळ व मारहाण केली.

त्यानंतर ट्रक विक्री करून आमची रकम वसूल करू, असे म्हणत त्यांच्या घरी जाऊन जबरदस्तीने ट्रक जमा करून घेतली. रोजीरोटीचे साधन संशयितांनी जमा करून घेतल्याने घरसंसार कसा चालवायचा, मुलीचे लग्न कसे करायचे आणि व्याजाचे पैसे कसे फेडायचे या विचाराने व्यथित झालेल्या दिलीप रौंदळ यांनी सोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास खुशाल ट्रान्सपोर्टजवळ विष प्राशन केले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अरूण बोधले, विजय लहामगे, चंन्द्रेश लोढया या तिघांवर दिलीप रौंदळ यांना आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात असून, विजय लहामगेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर अरूण बोधले, चंन्द्रेश लोढया या फरार संशयितांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक तोडकर हे पुढील तपास करीत आहेत.

पँटच्या खिशात सुसाइड नोट…
आत्महत्त्येपूर्वी दिलीप रौंदळ यांनी स्वतः लिहिलेली सुसाइड नोट त्यांच्या पँटच्या खिशात सापडली. रुग्णालयात घेऊन जाताना त्यांनी त्यांच्या मुलीला सुसाइड नोट बाबत माहिती दिली होती. या नोटच्या आधारेच गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button