कमी वयात हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतोय! तणाव दूर करण्यासाठी ‘हे’ करा उपाय | पुढारी

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतोय! तणाव दूर करण्यासाठी 'हे' करा उपाय

भारतात हृदयविकाराने मृत्युमुखी पडणार्‍यांची आकडेवारी उपलब्ध नाही; परंतु दरवर्षी जगभरात 25 लाख लोक हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. 2030 पर्यंत हा आकडा 3 कोटींपर्यंत पोहोचेल. भारतात या मृत्यूंपैकी 26 टक्के मृत्यू हृदयविकाराने (heart attack) होत आहेत. चिंतेचे कारण असे की, 18 वर्षांच्या तरुणांनाही हृदयासंबंधी आजार ग्रासत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, 35 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना हृदयविकाराचे झटके येण्याच्या बाबतीत भारत अन्य देशांच्या तुलनेत सर्वांत आघाडीवर आहे. 2020 च्या अखेरीपर्यंत हृदयवाहिन्यांचे आजार हे मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अधिकांश लोकांचा मृत्यू केवळ वेळेवर उपचार न मिळाल्याने होतो. कार्डिओ पल्मनरी रिसिटेशन (सीपीआर) तंत्र शिकण्यासाठी जास्तीत जास्त पाच मिनिटे लागतात, हे लोकांना ठाऊकच नाही. पूर्वी 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये कोरोनरी धमनीच्या रोगांनी ग्रस्त लोकांचे प्रमाण केवळ 10 टक्के होते. आज ते वाढून 30 टक्के झाले आहे.

भारतात संसर्गजन्य आजारांना मागे टाकून हृदयविकार हे मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. आकडेवारीनुसार शहरी लोकसंख्येचा जवळजवळ 30 टक्के हिस्सा आणि ग्रामीण लोकसंख्येचा 15 टक्के हिस्सा उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या आजारांनी ग्रस्त आहे. हृदयाच्या आजाराची जोखीम वाढविणारे घटक जसजसे वाढत आहेत, तसतशी मृत्यूच्या दरात वाढ होत आहे. दरवर्षी 24 लाख भारतीयांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो.

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण आपल्या देशात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अमेरिकेतील एका रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखातील माहितीनुसार, 2015 पर्यंत भारतात 6.2 कोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार जडले. त्यातील सुमारे 2.3 कोटी लोकांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. म्हणजेच 40 टक्के हृदयरुग्ण वयाने 40 वर्षांपेक्षा कमी आहेत. भारताला धक्कादायक अशी ही आकडेवारी आहे. संपूर्ण जगात ही आकडेवारी भारतातच सर्वाधिक वेगाने वाढत आहे, असे जाणकार सांगतात.

प्री-मॅच्युअर डेथ म्हणजे अकाली मृत्यूच्या कारणांमध्ये 2005 मध्ये हृदयविकारांचा (heart attack) क्रमांक तिसरा होता; परंतु 2016 मध्ये हृदयविकार हे अकाली मृत्यूचे क्रमांक एकचे कारण ठरले आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी हृदयाच्या आजारांचा संबंध केवळ वयोवृद्ध लोकांशी जोडला जात असे; परंतु गेल्या एका दशकातच हृदयाशी संबंधित आजारांची आकडेवारी काही वेगळीच कहाणी सांगत आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, भारतात हृदयविकाराने मृत्युमुखी पडणार्‍यांची आकडेवारी उपलब्ध नाही; परंतु दरवर्षी जगभरात 25 लाख लोक हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. 2030 पर्यंत हा आकडा 3 कोटींपर्यंत पोहोचेल. भारतात या मृत्यूंपैकी 26 टक्के मृत्यू हृदयविकाराने होत आहेत. चिंतेचे कारण असे की, 18 वर्षांच्या तरुणांनाही हृदयासंबंधी आजार ग्रासत आहेत. यात कोरोनरी आर्टरी डिसीज आणि हृदयविकाराचा झटका हे प्रमुख विकार आहेत.

इंडियन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, भारतात होणार्‍या एकूण हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांपैकी 50 टक्के घटना 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत घडत आहेत. 25 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींना अधिक प्रमाणात हृदयविकाराचे झटके येतात. खेड्यांच्या तुलनेत शहरांत या विकारासंबंधी जागरूकता अधिक दिसून येते.

काही व्यक्तींमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचे कोणतेही लक्षण आढळून येत नाही. त्याला सायलेंट मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणतात. सामान्यतः ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास असतो, त्यांच्या बाबतीत असे घडते. छातीत वेदना, आखडलेपण किंवा दबाव याबरोबरच अपचन, हृदयात जळजळ अशी लक्षणे दिसत असतील तर ती दुर्लक्षित करता कामा नये. हे हार्ट अ‍ॅटॅकचे संकेत असू शकतात.

पीजीआयचे हृदयरोगतज्ज्ञ प्रा. यशपाल शर्मा म्हणतात की, ज्या वेदना हातापर्यंत पोहोचत असतील किंवा चक्कर येत असेल किंवा रक्तदाबात अचानक घसरण आढळून येत असेल तरीसुद्धा अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. छातीत वेदना किंवा दबाव असेल आणि तो गळ्यापर्यंत आणि जबड्यापर्यंत पोहोचत असेल किंवा जलद चालण्याने, पायर्‍या चढल्याने धाप लागत असेल तरी सावध झाले पाहिजे.

ऑब्स्ट्रेक्टिव्ह स्लीप एपनियामुळे जोरात घोरण्याचा त्रास होत असेल किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना घाम येत असेल आणि हृदयाचे ठोके अनियमित असतील तर हृदयाची तपासणी करणे गरजेची असते. पांढरे किंवा गुलाबी बडके पडत असतील आणि त्यासोबतच खोकला दीर्घकाळ टिकत असेल किंवा पाय आणि टाचांमध्ये सूज असेल तर हृदय कमकुवत झाल्याचे हे निदर्शक असू शकतात.

कार्डिओलॉजिस्ट असे सांगतात की, वास्तविक देशातील युवकांचे हृदय कमकुवत झाले आहे. त्यांच्या मते, हृदय कमकुवत होण्याचे कारण नवीन जीवनशैली हेच आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते, महिलांमध्ये प्री-मेनोपॉज हृदयांचे आजार नसतात. त्यामागे महिलांमध्ये आढळून येणारे सेक्स हार्मोन्स हे कारण आहे. हे हार्मोन्स महिलांचे हृदयविकारापासून रक्षण करतात;

परंतु गेल्या काही वर्षांमध्ये प्री-मेनोपॉजच्या वयातच महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकसारख्या घटना दिसू लागल्या आहेत. पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचे डॉ. श्रीनाथ रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, जर एखादी महिला धूम्रपान करत असेल किंवा प्रदीर्घ काळ गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करत असेल तर हृदयविकाराशी लढण्याची तिची नैसर्गिक प्रतिकारक्षमता कमी होत जाते.

हार्ट अ‍ॅटॅकच्या (heart attack) धोक्यापासून बचाव करण्यासाठी तरुणांनी त्यांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. हा बदल योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शक्य आहे. योगामुळे तणाव दूर होतोच, शिवाय चित्त शांत होते आणि एकाग्रताही वाढते. तंबाखू आणि सिगारेटप्रमाणेच जंक फूडवरही सरकारने अधिक कर लावायला हवा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. जंक फूडवर ठळक अक्षरांत धोक्याचा इशाराही लिहिला गेला पाहिजे. त्यासाठी सरकार नियम तयार करू शकते.

शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीशी हृदयविकाराचा संबंध असतो, असे अनेकदा ऐकायला मिळते. त्यामुळे पदार्थ अधिक तेलात तळू नयेत आणि खाऊही नयेत. कोलेस्ट्रॉलमुळे नव्हे तर ट्रान्स फॅट्समुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका उद्भवू शकतो. ट्रान्स फॅट्स शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढवितो. वनस्पती तूप हा फॅटचा मुख्य स्रोत आहे, त्यामुळे त्यापासून दूरच राहायला हवे.

डॉ. संतोष काळे

Back to top button