बीड : वीज वितरणविरोधात केजच्या युवकाचे शोले स्‍टाईल आंदोलन | पुढारी

बीड : वीज वितरणविरोधात केजच्या युवकाचे शोले स्‍टाईल आंदोलन

केज ; पुढारी वृत्तसेवा डीपी वरचा ट्रान्सफॉर्मेर जळाल्यामुळे वीज बंद आहे. यामुळे शेतातील ऊस वाळून चालला आहे. याकडे वीज वितरणचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केज येथील एक युवक टेलिफोन टॉवरवर चढला. यामुळे एकच खळबळ उडाली.

याबाबतची माहिती अशी की, आज (सोमवार) दुपारी दाेन वाजण्याच्या दरम्यान केज येथील केज-बीड रोड लगत असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरवर महादेव त्रिंबक घुले हा  चढला. त्याच्या शेतातील डीपीवरचा ट्रान्सफॉर्मेर मागील सत्तावीस दिवसांपासून जळाला असल्याने बंद आहे. त्यामुळे शेतातील उभा ऊस जळून जात आहे. याबाबत त्याने जळालेल्या डीपी वरील ट्रान्सफॉर्मर काढून तो दुरुस्त करण्याबाबत अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र वीज वितरणचे अधिकारी दाद देत नव्हते. याला कंटाळून  आज दुपारी महादेव घुले बीएसएनएलच्या टॉवरवर चढला.

केज पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि अनिल मंदे, उमेश आघाव, बाळासाहेब अहंकारे, समीर पाशा, मंगेश भोले, मतीन शेख, इंगोले हे घटनास्थळी आले.  झाले. त्‍यांनी महादेव घुले आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्याची समजूत काढून त्‍याला खाली उतरवले.

” मागील सत्तावीस दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने माझे आर्थिक नुकसान होत आहे. मी माझ्या शेजारील शेतकऱ्यांची जमीन बटईने करून त्यात ऊस लागवड केली आहे. तसेच मी माझ्या कडील वीज थकबाकी भरण्यास तयार आहे. माझा शेतातील वीज पुरवठा सुरळीत करावा म्हणून अखेर वैतागून मला हे पाऊल उचलावे लागले.”

महादेव घुले

 

” या डीपी वरील शेतकऱ्यांनी थकबाकी भरणे आवश्यक आहे. थकबाकी भरल्यास तात्काळ प्राधान्याने ट्रान्फॉर्मर दुरुस्तीचे कार्यवाही केली जाईल.”

राजेश सी. अंबेकर, उपकार्यकारी अभियंता वीज वितरण उपविभाग केज

Back to top button