शेअर बाजारात ब्लॅक मंडे! सेन्सेक्स सुमारे १७०० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांना ६ लाख कोटींचा शॉक | पुढारी

शेअर बाजारात ब्लॅक मंडे! सेन्सेक्स सुमारे १७०० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांना ६ लाख कोटींचा शॉक

मुंबई; पुढारी ऑनलाईन

शेअर बाजारात आज सोमवारचा दिवस गुंतवणूकदारांसाठी कठीण दिवस ठरला. कारण कमकुवत जागतिक संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) तब्बल १७०० अंकांनी घसरला. तर निफ्टी (Nifty) १५, ९०० च्या खाली येऊन व्यवहार करत आहे. मागील सत्रातील २४६.८५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत गुंतवणूकदारांची संपत्ती २४०.५७ लाख कोटी रुपयांवर घसरली आहे. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मुल्य ६.२८ लाख कोटी रुपयांनी कमी झाले.

अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांनी रशियन क्रूड तेलाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे ब्रेंटची किंमत प्रति बॅरल १३९ डॉलर पातळीपर्यंत वाढली आहे. जुलै २००८ नंतरचा हा उच्चांकी दर आहे. याच पडसाद शेअर बाजारात उमटत आहेत.

दरम्यान, दुपारी दीड वाजता सेन्सेक्सची घसरण १५०० अंकांची होती. सेन्सेक्स ५२,९०० च्या खाली व्यवहार करत आहे. रशिया-युक्रेन संघर्षाचा फटका गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना बसत आहे.

दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने निच्चांकी पातळी गाठली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य ७७.०२ एवढे आहे. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. दोन्ही देशांमधील संघर्षामुळे तेलासह अन्नधान्यांच्या किंमती भडकल्या आहेत. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थांना मंदीचा धोका वाढला असल्याचे संकेत अर्थतज्ज्ञांनी दिले आहेत.

पहा व्हिडिओ : Power Women Pudhari Exclusive : महिला दिनानिमित्त पुढारीच्या वतीने विशेष मुलाखती

Back to top button