रोमानिया, स्लोव्हाकच्या पंतप्रधानांसोबत मोदींची फोन पे चर्चा | पुढारी

रोमानिया, स्लोव्हाकच्या पंतप्रधानांसोबत मोदींची फोन पे चर्चा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच रोमानियाचे पंतप्रधान निकोलाय इयोनेल चिऊका तसेच स्लोव्हाक गणराज्याचे पंतप्रधान एडूआर्ड हेगर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे आभार मानले. युक्रेनमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी आणि त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी विशेष विमानांना परवानगी दिल्याबद्दल दोन्ही देशाच्या पंतप्रधानांचे आभार मानले.

रशिया आणि युक्रेन युद्ध दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यामुळे युक्रेनमध्ये भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकून पडले आहेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोमानिया, स्लोव्हाकच्या पंतप्रधानांसोबत चर्चा करून युक्रेनमधील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पुढच्या काही दिवसांमध्ये तणावग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यास मदत करावी अशी विनंती मोंदी यांनी स्लोव्हाकचे पंतप्रधान एडूआर्ड हेगर यांच्याकडे करण्यात आली. भारतीयांना मायदेशी परत आणण्याच्या प्रयत्नांचे विशेष दूत म्हणून केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी हेगर यांना दिली.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेत रोमानियाने भारताला मदत केली. यामुळे पंतप्रधानांनी निकोलाय इयोनेल चिऊका यांचे देखील आभार मानले. विशेषतः अशा कठीण परिस्थितीत, भारतीय नागरिकांना रोमानियाचा व्हिसा नसतानाही प्रवेश देणे तसेच या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानांचे उड्डाण त्यांच्या भूमीवरून करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

भारताचे नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, पंतप्रधानांचे विशेष दूत म्हणून तिथे येत आहेत. तर ते पुढचे काही दिवस तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेवर देखरेख ठेवतील, अशी माहितीही मोदी यांनी चिऊका यांना दिली. ( नरेंद्र मोदींची चर्चा )

यावेळी दोन्ही देशाच्या पंतप्रधांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या हिंसा आणि मानवतेवर आलेल्या संकटावर दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी देशांचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रांची प्रादेशिक एकात्मता याचा सन्मान करणे महत्वाचे आहे यावर भर दिला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button