युक्रेनमधून महाराष्ट्रातील १३ विद्यार्थ्यांसह २४९ भारतीय मायदेशी परतले | पुढारी

युक्रेनमधून महाराष्ट्रातील १३ विद्यार्थ्यांसह २४९ भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून युक्रेनमध्ये अडकलेल्या २४९ भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे पाचवे विमान आज (सोमवार) सकाळी दिल्ली विमान तळावर उतरले.

रशियाने युक्रेनवर (Ukraine) हल्ले सुरू झाल्यानंतर या देशात अडकलेल्या नागरिकांना रोमानिया आणि हंगेरीमार्गे भारतात परत आणले जात आहे. रोमानिया आणि हंगेरी हे युक्रेनचे शेजारी देश आहेत. एअर इंडियाने आतापर्यंत ५ विमानांसह १,१५६ भारतीयांना परत आणले आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत बुडापेस्ट येथून सहावे विमान २४० भारतीय नागरिकांसह रवाना झाल्याचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सांगितले.

युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परत येणाऱ्या भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी ‘ओपगंगा हेल्पलाइन’ हे अधिकृत ट्विटर हँडल सुरू केले आहे. भारतीयांना परत आणण्याच्या ऑपरेशनला ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव दिले आहे. भारताने पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाकियामध्ये या देशांच्या युक्रेनच्या सीमेवरून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष तयार केला आहे. आज सकाळी विशेष विमानाने २४९ भारतीय मायदेशी परतले आहेत. यामध्ये १३ विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे मदत कक्ष स्थापन केला आहे.

विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची योजना केंद्राने सांगावी : राहुल गांधी

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी आणण्याची मागणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या योजनेची माहिती सरकारने त्यांच्या कुटुंबियांना द्यावी, असेही गांधी यांनी म्हटले आहे.

युक्रेनमधील सैनिकांकडून काही भारतीय विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओही गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. याबाबत गांधी यांनी म्हटले आहे की, अशा हिंसाचाराला बळी पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मला सहानुभूती आहे. कोणत्याही पालकांनी या परिस्थितीतून जाऊ नये.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ

रशिया -युक्रेन युद्ध :पुढे काय होणार?

Back to top button