कोरोनाने अनाथ ; अधिकारी झाले ‘पालक’ ; नाशिक जिल्ह्यातील 56 बालकांना मिळणार मायेची ऊब | पुढारी

कोरोनाने अनाथ ; अधिकारी झाले ‘पालक’ ; नाशिक जिल्ह्यातील 56 बालकांना मिळणार मायेची ऊब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीमुळे अनेक मुला-मुलींचे माता-पित्याचे छत्र हरपले. संकटाच्या समयी आप्तस्वकीयांनीही दूर सारले. त्यामुळे ऐन बालवयात नशिबी आले अनाथाचे जिणे. पण, संघर्षाच्या याच काळात महसूल विभागातील अधिकारी या अनाथांसाठी आशेचा किरण बनले आहेत. कोविडमुळे पालकांचे छत्र हरवलेल्या जिल्ह्यातील 56 अनाथ बालकांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पुढाकारामुळे पालक मिळणार आहेत.

देशभरात सध्या कोरोनाचा विळखा सैल होत आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून अवघ्या जगाला कोरोनाने विळख्यात घेतले आहे. महामारीच्या या काळात अनेकांनी त्यांच्या घरातील, जवळील तसेच मित्रपरिवारातील व्यक्ती गमावल्या. काही बालकांपासून त्यांचे आई-वडील कायमचे हिरावले गेले. अशा बालकांची जबाबदारी आता त्यांच्या नातेवाइकांवर पडली आहे. अशा बालकांसाठी शासनाने ’फूल ना फुलाची पाकळी’ म्हणून पाच लाख रुपये मदतीचा हात दिला. शासनाच्या मदतीनंतर आता अधिकारीदेखील समाज कर्तव्याच्या भूमिकेतून अनाथांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

राऊत-सोमय्यांना रोखा; जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाला केली विनंती

जिल्ह्यात कोरोनाने 56 बालके अनाथ झाली आहेत. जिल्हा प्रशासनाने या अनाथांपर्यंत शासनाच्या 30-40 योजना पोहोचविण्यासाठी तयारी केली आहे. एवढ्यावरच न थांबता जिल्हाधिकार्‍यांसह 40 अधिकार्‍यांनी या बालकांचे पालकत्व स्वीकारले आहे. या अधिकार्‍यांमध्ये तहसीलदार व उपजिल्हाधिकार्‍यांचा समावेश आहे. हे अधिकारी या बालकांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहेत. तसेच त्यांच्याकडे लक्ष देतानाच वेळोवेळी आवश्यक ती मदत व शिक्षणासाठी मार्गदर्शन करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणार आहेत. कोरोना काळात मानवी जीवनामध्ये दरी निर्माण झाली असून, आपलेच आपल्यापासून दुरावले आहेत. परंतु, या संकटसमयी महसूल अधिकार्‍यांनी अनाथांचे पालकत्व स्वीकारत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना ’उभारी’ योजनेतून जगण्याची नवी उमेद दिली. आता कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात अशी 56 बालके असून, त्यांना आम्ही दत्तक घेणार आहोत. तसेच त्यांचे शासकीय दूत म्हणून काम करणार आहोत.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

दोघा बालिकांसाठी मांढरे देवदूत : नाशिक शहरातील दीड वर्षाच्या कावेरी व प्राजक्ता साबळे या दोघा जुळ्या बालिकांनी कोरोनामुळे पालक गमावले आहेत. या दोन्ही बालिकांचे पालकत्व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वीकारले आहे. नाशिकचे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी शहरातील स्वरा व स्वनिक पगारे या भावंडांचे, तर मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे यांनी चांदवडमधील आशा, हर्षल व प्रतीक पगारे या भावंडांचे पालकत्व स्वीकारले आहे.

कोरोना अनाथांची संख्या

चांदवड 7, दिंडोरी 1, इगतपुरी 2, नांदगाव 5, सटाणा 1, कळवण 2, निफाड 7, सिन्नर 5, त्र्यंबकेश्वर 1, येवला 2, नाशिक 23.

हेही वाचा ;

Back to top button