Sangli : अनाधिकृतरित्या विद्युतप्रवाह सुरू ठेवल्याने माय-लेकीचा मृत्यू | पुढारी

Sangli : अनाधिकृतरित्या विद्युतप्रवाह सुरू ठेवल्याने माय-लेकीचा मृत्यू

जत (जि. सांगली) ,पुढारी वृत्तसेवा : जाडरबोबलाद (ता. जत) येथे शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी बायडिंगच्या तारेत कंपाउंडला दोघा शेतकऱ्यांनी संगनमताने अनाधिकृतरित्या विद्युतप्रवाह सुरू ठेवल्याने माय-लेकीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिद्धनगौडा ईश्वरगौडा पाटील व बसवंत रेवणसिद्ध तेलगाव ( रा. जाडरबोबलाद) या दोघांविरोधात निष्काळजीपणे केलेल्या कृत्यामुळे व्यक्तींचा मृत्यू होणे व

भारतीय विद्युत अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जाडरबोबलाद येथे सुवर्णा हेळवार यांची मुलगी विद्या संजय हेळवार (वय.२५)ही कराड येथील सासरहून माहेरी आली होती . दरम्यान विद्या ८ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असलेल्या सिद्धनगौडा पाटील यांच्या शेतात गेल्या होत्या. यावेळी पाटील व तेलगाव यांनी संगनमताने शेतीचे नुकसान होऊ नये. शेतीच्या भोवती कंपाउंडला बायडिंग तार वापरली होती. या तारेत अनधिकृतपणे विजेचा प्रवाह सुरू केला होता.

विद्याचा या तारेस स्पर्श होताच जागीच मृत्यू झाला. विजेचा धक्का लागल्याने केलेल्या आवाजाने विद्याची आई सुवर्णा या तिला वाचवण्यासाठी आल्या होत्या यावेळी त्यांचाही जागीच मृत्यू झाला. उमदी पोलीसात दोघांची मयत म्हणून नोंद होती. परंतु शनिवारी सुवर्णा यांचे पती भिमांना हेळवार यांनी उमदी पोलिसात पाटील व तेलगाव हे पत्नी व मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेबाबतची फिर्याद दिली आहे. सदरचा मृत्यू संशयित दोघांच्या निष्काळजीपणे व हयगय केल्याप्रकरणी झाला असल्याचं या फिर्यादीमध्ये म्हटले आहे .यानुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.

हे ही वाचलं का  

Back to top button