नाशिक : बनावट कागदपत्राव्‍दारे प्लॉट खरेदी : चौघांविराेधात गुन्हा दाखल | पुढारी

नाशिक : बनावट कागदपत्राव्‍दारे प्लॉट खरेदी : चौघांविराेधात गुन्हा दाखल

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : जळगाव महापालिका हद्दीत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट खरेदीत फसवणूक केल्या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  याप्रकरणी एका महिलेस अटक करण्यात आली आहे.याबाबत सुरेश मांगीलाल बाफना (रा. सुयोग कॉलनी) यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे.

बाफना यांच्या मालकीचा जळगाव मनपा हद्दीत मेहरूणमधील शेत सर्व्हे क्रमांक १६३/१ ब मधील बखळ प्लॉट क्रमांक १७ असून त्याची किंमत ३५ लाख रुपये आहे. हा प्लॉट इम्रान मुख्तार तांबोळी रा. प्लॉट क्रमांक ४५ इंद्रप्रस्थनगर एमआयडीसी याने खरेदी केला. त्या बाबत दुय्यम निबंधक जळगाव १ यांच्याकडे तसा दस्त क्रमांक ७५६/२०२१ नुसार खरेदीखत नोंदवून प्लॉट खरेदी केला आहे.

दरम्यान, खरेदीखत करताना अरुणा दिलीप चौधरी (वय ५२, रा. एलआयसी कॉलनी) व फारुख शेख रहेमदुल्ला खाटीक (वय ४७, रा. मास्टर कॉलनी) यांनी हजर राहून खरेदी लिहून घेणार व लिहून देणार यांना ओळखतात अशी खोटी माहितीदिली. सर्वांनी संगनमताने बाफना यांच्या नावाचे आधारकार्ड व पॅनकार्ड बनावट तयार केले. ते खरे असल्याचे भासवून त्या कागदपत्रांनुसार बाफना यांच्या प्लॉटची खरेदी करून फसवणूक केली आहे.

स्वत: सुरेश बाफना यांना या प्रकाराची कोणतीही कल्पना नव्हती. त्यांनी २४ जानेवारी रोजी मेहरुण तलाठी कार्यालयातून सातबारा उतारा घेतल्यानंतर या उतार्‍यावरील नाव कमी होवून इम्रान मुख्तार तांबोळी, रजीयाबी मुश्ताक खाटीक, शेख अयुब शेख युसूफ तांबोळी, शेख जुबेर शेख सलीम खाटीक यांचे नाव लागलेले दिसले. यामुळे त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी माहिती घेतली. तेथे २ मार्च २०२१ रोजी खरेदी झाल्याचे दस्तावरुन निदर्शनास आले.

मालकी हक्काबाबत वर्तमानपत्रात जाहीर नोटीसही देण्यात आलेली होती. बाफना यांनी खरेदीखत प्राप्त केले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्‍यानंतर त्‍यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. यामध्ये एमआयडीसी पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अरुणा चौधरी हिला अटक केली आहे.

हेही वाचा :

Back to top button