भुदरगड पोलीसांनी थरारक पाठलाग करून सहा दरोडेखोरांना केले जेरबंद | पुढारी

भुदरगड पोलीसांनी थरारक पाठलाग करून सहा दरोडेखोरांना केले जेरबंद

गारगोटी ; पुढारी वृत्तसेवा : नवले घाटात गाडी अडवून प्रवाशांना जोरदार मारहाण करून चेन हिसकावून पलायन करणार्‍या सात जणांच्या चोरट्यांच्या टोळीला भुदरगड पोलीसांनी सिने स्टाइलने मोठ्या शिताफीने अटक केली. या प्रकरणी भुदरगड पोलीस स्‍टेशन मध्ये अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्यातील सहा जणांवर (बुधवार) मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या दरोडेखोरांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

बाळकृष्ण शामराव पाटील (मुरूडे, ता. आजरा) व त्यांचा मित्र कडगाव येथून आपल्या मुरूडे गावी चारचाकी इरटीगा गाडीने सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान जात होते. या दरम्यान गोवा येथून राहुरी तालुक्यातील मद्यधुंद युवक आपल्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओ (एमएच-16, सीक्यु 0104) गाडीतून गारगोटीच्या दिशेने येत होते. यावेळी नवले येथे राहुरीच्या चोरट्यांनी इरटीगा गाडीतील प्रवाशांची लूट करण्याच्या इराद्याने इरटीगा गाडी अडवून बाळकृष्ण पाटील व त्यांच्या मित्रास जोरदार मारहाण केली. यावेळी बाळकृष्ण यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन मिलींद दत्तात्रय हरीषचंद्रे (वय 23, रा. खंडबे बुद्रुक, ता. राहुरी) याने मारून लांबवली. यानंतर स्कार्पीओ गाडीतील सर्व युवकांनी पलायन केले.

फिर्यादी बाळकृष्ण पाटील याने तातडीने भुदरगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. तसेच स्कार्पीओ गाडीचा पाठलाग सुरु ठेवला. भुदरगड पोलीसांनी तातडीने पोलीस यंत्रणा सतर्क करून सर्वत्र नाकाबंदी केली. नवले गारगोटी मार्गावरील सर्व पोलीस पाटील यांना माहिती देऊन टेहाळणी करण्यास सांगितले. स्कार्पीओ गाडी गारगोटीच्या दिशेने येत असल्याचे समजताच पोलीस कॉन्स्टेबल विक्रम चौत्रे, श्रीकांत चौगले, सुशांत कांबळे, बाळासो परीट, रोहित टिपुगडे यांनी स्कार्पीओ अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्यधुंद चोरट्यांनी पोलीसांना चकावा देऊन गाडी पुढेच दामटली.

पोलीसांनी स्कार्पीओचा पाठलाग सुरु ठेवला. चोरटे पुढे व पोलीस मागे असा थरारक पाठलाग सुरू होता. सिनेस्टाइलसारखा थरारक गारगोटीतील नागरीकांना पहावयास मिळाला. यावेळी नागरीकांनीही स्कार्पीओचा पाठलाग सुरु ठेवला होता. मात्र प्रसंगावधानाने विक्रम चौत्रे व त्यांच्या साथीदारांनी गारगोटी बसस्थानकासमोरील क्रांती हॉटेल समोरील रस्त्यावर ट्रॉलीसह ट्रॅक्टर अडवा लावून रस्ता रोखून धरला व चोरटयांना स्कार्पीओ गाडीसह मोठ्या शिताफीने पकडले.

या प्रकरणी समीर सुरेश पारखे (वय-23 रा, धामोरे खुर्द), मिलींद दत्तात्रय हरीषचंद्रे (वय-23 खंडबे बुद्रुक), प्रतिक अर्जुन लटके (वय-23), सोमेश्‍वर प्रकाश हरीषचंद्रे (वय-25) अभिमन्यू भागवत पवार (वय-23 रा. खंडबे खुर्द), महेश परसराम कल्हापुरे (वय-23, रा. वांबोरी ) सर्व अहमनगर जिल्हातील राहुरी तालक्यातील आहेत. या सहा जणांवर पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या सहा जणांसह एक सैनीक गोवा या ठिकानी मौजमजा करण्यासाठी गेले होते. मध्यधुंद अवस्थेत गावी परतत असतांना त्यांनी हा प्रताप केला असुन, यातील प्रतीक अर्जुन लटके याच्यावर दहा गुन्हे दाखल असुन तो सराइत गुन्हेगार आहे. त्‍याच्यावर चेन स्नॅचींगचाही गुन्हा दाखल आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करत आहेत. आज त्या सहा जणांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

पोलीसांचे कौतुक …. 

पोलीस कॉन्स्टेबल विक्रम चौत्रे व त्यांच्या साथीदारांनी दरोडेखोरांचा थरारक पाठलाग करून मोठ्या शिताफीने दरोडेखोरांना जेरबंद केल्यांने पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Back to top button