

वास्को; पुढारी वृत्तसेवा : गोवा आमच्यासाठी परराज्य नाही. गोवा मुक्तीसाठी पोर्तुगिजांविरोधात लढा उभारणारा मूळपक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष होता. भाऊसाहेब बांदोडकर देखील याच पक्षाचे आहेत. त्यांना गोव्याचे भाग्यविधाते मानले जाते. महाराष्ट्र आणि गोव्याचे एक वेगळे नाते आहे. गोव्याला परराज्य म्हणणाऱ्या लोकांना हे नाते माहित नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
वास्को येथील पक्ष कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. मारुती शिरगावकर यांच्या प्रचारार्थ ते आज गुरुवारी (दि.१०) रोजी वास्कोत उपस्थित होते. दक्षिण गोव्यात शिवसेनेच्या इतर उमेदवारांच्या मतदारसंघात ते घरोघरी प्रचार करत आहेत.
गोव्यातील मराठी जनतेसोबत, ख्रिस्ती व मुस्लिम जनतेचाही पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता हे अनेकांच्या नजरेत खुपते आहे; पण त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही.
आम्ही आमचा प्रचार करतो आहोत, गोवा आमच्यासाठी परराज्य नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.