नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणाचे धागेदोरे मिळेनात, मित्रांचीही झाली चौकशी | पुढारी

नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणाचे धागेदोरे मिळेनात, मित्रांचीही झाली चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खून प्रकरणात त्यांचा पती संदीप वाजे यास अटक केली आहे. मात्र, पोलिस कोठडीत त्याच्याकडून माहिती मिळत नसल्याने इतर मारेकर्‍यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला असून, संदीप वाजेच्या मोबाइलच्या माहितीवर तपास केंद्रित झाल्याचे चित्र आहे.

मनपातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाजे यांचा मृतदेह वाडिवर्‍हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून त्यांचे पती संदीप वाजे यास अटक केली. कौटुंबिक कारणातून संदीप वाजे याने पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कार जाळल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या गुन्ह्यात संदीपला इतर तीन ते चार संशयितांनी मदत केल्याचाही प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. न्यायालयाने संदीपला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी वाजे कुटुंबीयांसह संदीपच्या मित्रांचे जाबजबाब घेतले आहे. त्यातूनही ठोस माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी संदीप वाजे याचा मोबाइल जप्त केला असून, त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का यावर लक्ष केंद्रित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप वाजे तपासात सहकार्य करत नसल्याने इतर आरोपींपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे.

संदीप वाजे याच्या मित्रांकडूनही माहिती मिळाली असली तरी त्यातून ठोस निष्कर्ष निघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिस घटनास्थळापर्यंत जाणार्‍या मार्गावरील सीसीटीव्ही, मोबाइलचे लोकेशन, संभाषण, मेसेज यांची पाहणी करून त्यातून खुनाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी एक संशयित अटकेत आहे. संदीप व सुवर्णा वाजे यांच्या नातलग व मित्रांचे जाबजबाब घेतले आहे.
– अनिल पवार,
पोलिस निरीक्षक, वाडिवर्‍हे

हेही वाचा ;

Back to top button