निफाड : नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या रूपाली रंधवे यांचे नाव निश्चित | पुढारी

निफाड : नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या रूपाली रंधवे यांचे नाव निश्चित

निफाड : पुढारी वृत्तसेवा
नगरपंचायत निवडणुकीनंतर निफाडच्या नगराध्यक्षा होण्याचा बहुमान शिवसेनेच्या उमेदवार रूपाली विक्रम रंधवे यांना मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत मंगळवारी (दि. 8) रंधवे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपद निवडणुकीची आता केवळ औपचारिकता बाकी आहे.

रंधवे या शिवसेनेच्या उमेदवार असून, युवा सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या त्या पत्नी आहेत. निफाड नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 11 जागांवर शिवसेना आणि शहर विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापैकी 10 महिला नगरसेवक विजयी झाल्या आहेत. निफाड नगरपंचायतीचे अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव झाल्याने नगराध्यक्ष होण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. निफाड येथील एका हॉटेलमध्ये दोन्ही गटांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम आणि निफाड शहर विकास आघाडीचे राजाभाऊ शेलार यांच्यामध्ये सत्ता वाटपावरून काहीकाळ रस्सीखेच झाली. मात्र, चर्चेअंती राजाभाऊ शेलार यांनी सुचविलेला तोडगा सर्वानुमते मान्य करण्यात आला.

त्यानुसार नगराध्यक्षपदाचे महिलांसाठीचे आरक्षण हे अडीच वर्षे कायम राहणार असल्याने, विजयी महिला उमेदवारांपैकी 5 महिला उमेदवारांना प्रत्येकी पाच महिन्यांचा कार्यकाळ रोटेशन पद्धतीने देण्याचे निश्चित करण्यात आले, तर उपनगराध्यक्ष म्हणून अनिल कुंदे यांना पूर्णवेळ संधी देण्याचे धोरण आखण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button