Goa Election : स्थैर्य, विकासासाठी भाजपला साथ द्या – नितीन गडकरी | पुढारी

Goa Election : स्थैर्य, विकासासाठी भाजपला साथ द्या - नितीन गडकरी

पेडणे/थिवी/शिवोली : पुढारी वृत्तसेवा माझ्या खात्याने गोवा राज्याला आजवर 40 हजार कोटींचा निधी देऊन पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. मुंबई ते गोवा महामार्गासाठी भरीव निधी दिला. स्व. मनोहर पर्रीकर आणि खासदार श्रीपाद नाईक यांच्या आग्रहामुळे मोपा विमानतळ साकारत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मंगळवारी सायंकाळी पेडणे, थीवी आणि शिवोली मतदारसंघात कोपरा बैठका घेतल्या. या तिन्ही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पेडणे येथील सभेत बोलताना ते म्हणाले, भाजप सरकारच्या काळात पेडणेचा विकास होणे सुरू झाले.  (Goa Election)

स्व. पर्रीकर यांच्या स्वप्नातील गोवा घडवण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रयत्नशील आहेत. मुंबई – गोवा महामार्ग पूर्णत्वास येत आहे. यापुढे गोवा – कर्नाटक महामार्ग होणार आहे. यासाठी मी 15 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गोव्यातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिला असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. पेडणेतील नियोजित आयुष हॉस्पिटल, स्पोर्ट्स सिटी, मोपा विमानतळ हे प्रकल्प भाजपच्या काळात साकारत आहेत. या सर्व ठिकाणी स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. तर हजारो युवकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळेल. पेडणेतील सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उमेदवार प्रवीण आर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Goa Election)

यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झाली.थिवी येथील सभेत बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, गेल्या दहा वर्षांत भाजपने देशात आणि गोव्यात मोठा विकास केला आहे. कधीकाळी राजकीयदृष्ट्या अस्थिर गोवा म्हणून प्रसिद्ध होता. पण भाजपने सलग दहा वर्षे स्थिर आणि पारदर्शी सरकार दिले.

यामुळे नागरिकांचा भाजपवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.थिवी येथील सभेला प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उमेदवार नीळकंठ हळर्णकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शिवोलीतील सभेस मंत्री श्रीपाद नाईक, उमेदवार दयानंद मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सभांवेळी स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हेही वाचलतं का?

Back to top button