सोलापूर: विशाल फटेची जिल्हा कारागृहात रवानगी | पुढारी

सोलापूर: विशाल फटेची जिल्हा कारागृहात रवानगी

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावे फसवणूक करणार्‍या बार्शी येथील विशाल फटे याला मंगळवारी (ता. 1) न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानुसार त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध 128 जणांनी फसवणुकीच्या तक्रारी दिल्या असून, त्याची रक्कम 25 कोटींच्यावर गेली आहे.

बार्शी येथील लोकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा विशाल फटे हा काही दिवसांपूर्वी पोलिसांसमोर हजर झाला होता. दरम्यान, विशाल याचे वडील व भाऊ यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी विशाल फटे याला कोर्टापुढे उभे केले असता न्यायाधिशांनी आरोपी फटे याला प्रथम 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. तर या गुन्ह्याची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास ग्रामीण आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस उपअधीक्षक संजय बोटे यांच्याकडे आला होता.त्यानंतरसुद्धा विशाल फटे याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या होत्या. पोलिसांकडून विशाल फटे व त्याच्या घरच्यांची व नातेवाईकांची बँक खाती गोठविण्यात आली होती.

त्यानंतर पोलिसांनी विशाल फटे याच्या पोलिस कोठडीची मुदत राखून त्याला एक दिवस न्यायालयीन कोठडी घेतली होती. नंतर पुन्हा फटे याला 5 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. विशाल फटे या सराईत गुन्हेगाराला पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी पुन्हा कोर्टापुढे उभे केले असता न्यायाधीशांनी विशाल फटे याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलिसांनी आरोपी विशाल फटे याची रवानगी जिल्हा कारागृहात केली आहे.

हेही वाचलत का?

Back to top button