Budget 2022 : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार २.३७ लाख कोटी, अर्थमंत्र्यांची घोषणी आहे तरी काय? | पुढारी

Budget 2022 : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार २.३७ लाख कोटी, अर्थमंत्र्यांची घोषणी आहे तरी काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क

Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. पीक मूल्यांकन, जमिनींच्या नोंदी आणि कीडनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनला प्रोत्साहन देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून केली आहे. तसेच येत्या आर्थिक वर्षाच्या खरीप हंगामात १६३ लाख शेतकऱ्यांकडून १,२०८ लाख मेट्रिक टन गहू आणि धानाची (भात) खरेदी होईल असा अंदाज आहे. यामुळे किमान आधारभूत किमतीचे (MSP) सुमारे २.३७ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

शेत जमिनीच्या सिंचनासाठी अर्थमंत्र्यांनी ४४,६०५ कोटी रुपयांच्या केन-बेतवा लिंक योजनेला मंजुरी दिली. येत्या आर्थिक वर्षात तेलबियांच्या उत्पादनवाढीवर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर अर्थमंत्र्यांनी सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची बाब अर्थसंकल्पात नमूद केली आहे. त्यांनी महत्वाची म्हणजे कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी मंजुरी दिली आहे.

संपूर्ण देशभरात रासायनिक मुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. शेतकर्‍यांना डिजिटल आणि उच्च-तंत्रज्ञान सेवांच्या वितरणासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन आणि विस्तार संस्थांसह खासगी क्षेत्रातील ऍग्रीटेक तज्ज्ञ आणि कृषी मूल्य साखळीतील भागधारकांच्या सहभागाने पीपीपी मोडची योजना सुरू करण्यात येणार आहे. नैसर्गिक झिरो बजेट शेती आणि सेंद्रिय शेती, आधुनिक शेती, मूल्यवर्धन आणि व्यवस्थापन आदींसाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत सुधारणा करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल, असेही अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. यंदाच्या अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्राशी संबंधित काही महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button