नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला: 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचा आदेश | पुढारी

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला: 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचा आदेश

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी भाजपचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. येत्या 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण जाण्याचा सल्लाही न्यायालयाने नितेश यांना दिला आहे. नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने २७ तारखेपर्यंत अंतरिम संरक्षण दिले होते. आता नितेश यांचा जामीन अर्ज  सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्‍याने त्‍यांच्‍या अडणीत वाढ झाली आहे.

सिंधुदुर्ग न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर नितेश यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने नितेश यांना जामीन देण्यास नकार दिला होता. यानंतर नितेश यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. राज्य सरकार सूडबुद्धीने नितेश यांच्याविरोधात कारवाई करीत असल्याचा युक्तिवाद नितेश यांचे वकील मुकूल रोहतगी यांनी केला होता. दुसरीकडे सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद नाकारत नितेश राणेंविरोधात याआधीच अनेक आरोप आहेत. संबंधित प्रकरणात नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा, असे सांगितले होते.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळत त्यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली. आदेशानुसार पुढील १० दिवस पोलीस नितेश राणे यांना अटक करू शकणार नाहीत. पण नितेश यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शरण आल्यानंतर नितेश राणे नियमित जामिनासाठी अर्ज करु शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Back to top button