KL Rahul : राहुलची कर्णधारपदाची कारकीर्द संपुष्टात! BCCI अधिकाऱ्याने केले धक्कादायक विधान | पुढारी

KL Rahul : राहुलची कर्णधारपदाची कारकीर्द संपुष्टात! BCCI अधिकाऱ्याने केले धक्कादायक विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केएल राहुलची (KL Rahul) फ्लॉप कॅप्टनसी पाहिल्यानंतर आता बीसीसीआयने (BCCI) आश्चर्यकारक विधान केले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने केएल राहुलच्या कर्णधारपदाबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारताने केएल राहुलच्या नेतृत्वाखाली द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका ३-० ने गमावली.

राहुलला कसोटी कर्णधारपद मिळणे अवघड… (KL Rahul)

रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त असून त्याच्या तंदुरुस्तीची समस्या पाहता राहुलला कसोटी कर्णधार बनवता येईल का, असा प्रश्न बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याला पीटीआयने विचारला होता. यावर अधिकाऱ्याने उलट प्रश्न विचारला की, तुम्हाला कोणत्याही दृष्टिकोनातून केएल राहुल (KL Rahul) दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा कर्णधार वाटतो का?

केएल राहुलची कर्णधारपदाची कारकीर्द संपली! (KL Rahul)

द. आफ्रिका दौऱ्यावर केएल राहुलने कर्णधारपद भूषवलेल्या सर्व सामन्यांमध्ये भारताला वाईट रीतीने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोहलीची वनडे संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी केल्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) देण्यात आली. पण मुंबई येथे सरावसत्रात रोहित शर्मा जखमी झाला. यानंतर द. अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. पण, राहुलचे तिन्ही सामन्यात एक कर्णधार म्हणून म्हणावे तशी लक्षवेधी कामगिरी झाली नाही आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाला व्हाईट वॉशला सामोरे जावे लागले.

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एवढा खराब खेळ दाखवला की, दक्षिण आफ्रिकेने त्यांना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० ने पराभूत केले. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

BCCI च्या अधिकाऱ्याने दिले धक्कादायक विधान…

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारताचा पुढचा कसोटी कर्णधार कोण असेल याची चर्चा जोर धरू लागली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या पुढील कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत जिथे रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे, तिथे भविष्याचा विचार करून केएल राहुललाही (KL Rahul) कसोटी कर्णधार बनवले जाऊ शकते. पण त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने गमावले, तेव्हा बीसीसीआयही (BCCI) नाराज आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी केएल राहुल हा एक पर्याय आहे, परंतु द. आफ्रिकेतील त्याच्या कर्णधारपदाच्या निकालामुळे तो अडचणीत आला आहे.’

फेब्रुवारीमध्ये निवड समितीची बैठक…

‘रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत केएलकडे पर्याय म्हणून पाहिले जाते. पण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याच्यावर ज्या प्रकारची टीका होत आहे; त्यामुळे आमच्यासाठी खूप त्रास होणार आहे,’ असे अधिकाऱ्याने सांगितले. ‘निवड समितीची फेब्रुवारीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये कसोटी कर्णधाराची चर्चा होऊ शकते किंवा नाही. पण सध्या काही लवकर कसोटी मालिका नाहीय. त्यामुळे कसोटी कर्णधाराची घोषणा करण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

कसोटी कर्णधारावर चर्चा होईल…

‘आम्ही नवीन कसोटी कर्णधाराबद्दल चर्चा केलेली नाही. पण, या प्रक्रियेत रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. पण माझ्या वैयक्तिक दृष्टीने त्याचा फिटनेस कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत अडथळा बनू शकतो,’ असे अधिकारी म्हणाले. ‘रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या फिटनेसला न्याय देऊ शकेल का? असा प्रश्न उपस्थित होतो. पण, निवडकर्त्यांना वाटत असेल की तो तंदुरुस्त आहे तर त्याला कसोटी संघाची जबाबदारी दिली जाऊ शकते,’ अशीही त्यांनी माहिती दिली.

Back to top button