Vamika : वामिकाचा फोटो व्हायरल झाल्याने विराट कोहली नाराज, म्हणाला... | पुढारी

Vamika : वामिकाचा फोटो व्हायरल झाल्याने विराट कोहली नाराज, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी या सामन्यातील एका घटनेने सर्वच चाहते सुखावले आहेत. या सामन्याच्या माध्यमातून माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) कन्या वामिका (Vamika) हिची पहिली झलक जगासमोर आली. वामिकाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पण स्वतः विराट कोहलीने या फोटो आणि व्हिडिओ वरून एक निवेदन जारी केले आहे. याबाबत त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

विराटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, काल (दि. २३) आमची कन्या वामिका (Vamika) हिचा फोटो स्टेडियममध्ये क्लिक करण्यात आला आणि तो शेअर केला जात आहे. आम्‍ही तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, अनुष्काला (Anushka Sharma) आणि कन्या वामिका हिला सावधगिरीने कॅमे-यात कैद करण्यात आले. कॅमेर्‍याची नजर दोघांवर असल्याचे त्यांना कळले नाही. मुलीच्या फोटोबाबत आमची भूमिका पूर्वीसारखीच आहे. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही वामिकाचे फोटो क्लिक किंवा प्रिंट करू नये. त्यामागचे कारण आधी सांगितल्याप्रमाणेच आहे, धन्यवाद.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी (दि. २३) खेळला जात होता, त्यावेळी विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा कन्या वामिकासह (Vamika) स्टँडमध्ये उपस्थित होती.

अनुष्का शर्मा आणि वामिका विराट कोहलीला प्रोत्साहन देत होत्या, त्यानंतर विराट कोहलीनेही बॅटला बाळाप्रमाणे कुशीत घेऊन झुलवले. त्याची ही ॲक़्शन पाहून अनुष्काला आनंद झाला. तिने वामिकाला वडील विराट कोहलीकडे पाहण्यास सांगितले. या दोन्ही ॲक़्शन कॅमे-यात कैद झाल्या आणि सोशल मीडियावर वनव्या प्रमाणे व्हायरल झाल्या. अखेर कोहली आणि अनुष्काच्या चाहत्यांना वामिकाला पाहण्यासाठी वर्षभराहून अधिक काळ वाट पाहावी लागली. अनेक चाहते वामिकाची तुलना विराटच्या बालपणीच्या फोटोशी करत आहेत.

विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका हिचा जानेवारीत पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी टीम इंडियाचा द. आफ्रिका दौरा सुरू होता, आणि संघ दुसरा कसोटी सामना खेळत होता. पण या सामन्यातून विराट दुखापतीच्या कारणास्तव बाहेर बसला होता. विराट आणि अनुष्का यांनी याआधीही माध्यम प्रतिनिधींना आपल्या मुलीचे फोटो काढू नका, असे आवाहन केले होते. ती जोपर्यंत सज्ञान होत नाही तो पर्यंत दोघांना वामिकाची प्रसिद्धी टाळायची आहे.

Back to top button