कोल्हापूर ; बाह्यरुग्ण विभाग आता सायंकाळीही राहणार सुरू | पुढारी

कोल्हापूर ; बाह्यरुग्ण विभाग आता सायंकाळीही राहणार सुरू

कोल्हापूर ; विकास कांबळे : सार्वजनिक आरोग्य विभाागांतर्गत सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सकाळप्रमाणेच सायंकाळीही बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. तशा सूचना आरोग्य सेवा आयुक्‍त डॉ. रामास्वामी एन. यांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी यांना दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या रुग्णालयांना देखील हा निर्णय लागू करण्याची मागणी होत आहे.

आरोग्य सेवा दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. गोरगरीबच नव्हे तर मध्यमवर्गीयांनाही खासगी रुग्णालयातील सेवा परवडत नसल्याने शासकीय रुग्णालये सर्वांसाठी आधारवड ठरत आहेत. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये फक्‍त सकाळीच चार ते पाच तास बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो. सायंकाळी एक-दोन तास बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती; परंतु आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अधिकार्‍यांची संख्या अपुरी असल्याने तसेच कर्मचार्‍यांची संख्याही पुरेशी नसल्याने आजपर्यंत या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले; परंतु आता बाह्यरुग्ण विभाग दोन वेळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य सेवा आयुक्‍तांनी पत्रात म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणार्‍या शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा व सायंकाळी चार ते सहा अशी निश्‍चित करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग मार्गदर्शक सूचनानुसार चालणे अपेक्षित आहे. सर्व शासकीय रुग्णालयामध्ये सकाळी बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो. सायंकाळी बाह्यरुग्ण विभाग नसल्याने नागरिक या सुविधेपासून वंचित राहत आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत असणारी सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, विविध शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य पथके आणि आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यात येणार आहे.

* बाह्यरुगण विभागाची वेळ सकाळी 8.30 ते
12.30 व सायंकाळी 4 ते 6 अशी राहील
* सोमवार आणि शनिवारी सार्वजनिक सुट्टी
असली तरीही बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार
* एक वैद्यकीय अधिकारी असल्यास प्राथमिक
* आरोग्य केंद्रातील दुपारची ओपीडी बंद राहील
आरोग्यवर्धिनी केंद्रात दुपारची ओपीडी बंद राहील

शासनाच्या वतीने चांगला निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे; परंतु वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या सीपीआरसारख्या राज्यातील शासकीय रुग्णालयातही सायंकाळी दोन तास बाह्यरुग्ण विभाग सुरू करावा.
चंद्रकांत यादव, ज्येष्ठ कार्यकर्ते, माकप

सर्वसामान्यांसाठी थोरला दवाखाना म्हणून परिचित असणारा सीपीआर हा आधारवड वाटतो. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून रुग्ण विश्‍वासाने येथे येत असतात. यापूर्वी दुपारी 1 वाजता बाह्यरुग्ण विभाग बंद होत असल्याने गैरसोय होत असे. मात्र, आता सायंकाळीही बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार असल्याने गोरगरिबांसाठीचा हा थोरला दवाखाना ही बिरुदावली प्रत्यक्षात उतरणार आहे.
– वसंतराव मुळीक

Back to top button