निफ्टी आणि सेन्सेक्स : अर्थवार्ता | पुढारी

निफ्टी आणि सेन्सेक्स : अर्थवार्ता

* गतसप्‍ताहात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये अनुक्रमे एकूण 638.60 आणि 2185.85 अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 17617.15 व 59037.18 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये एकूण 3.50 टक्के व 3.57 टक्क्यांची घट नोंदवली गेली. अमेरिकेसह जगभरामध्ये महागाई वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे व्याजदर पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेचे जो बायडन यांनीदेखील तेथील मध्यवर्ती बँक फेडरल बँकेला व्याजदर वाढवण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जास्त व्याजदराच्या अपेक्षेने पैशाचा व पुन्हा अमेरिकेकडे वळण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम भारतासारख्या विकसनशील देशांच्या भांडवल बाजारावर झाला. 26 नोव्हेंबरनंतर बाजारात एकूण एका सप्‍ताहांत झालेली ही सर्वाधिक मोठी घसरण आहे.

महागाईची चिंता तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या Policy Tightening Measures चा परिणाम बाजार कोसळण्यामध्ये झाला. बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, टाटा स्टील, भारती एअरटेल यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या समभागामध्ये सर्वाधिक घसरण झाली. हिंदुस्थान युनिलिव्हरसारख्या कंपन्यांनी जाहीर केलेले चांगले निकालदेखील बाजाराला कोसळण्यापासून थांबवू शकले नाहीत.

* आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव (Brent crude) पुन्हा एकदा भडकले आहेत. ब्रेंट क्रूडने 88 डॉलर प्रती बॅरल किमतीची पातळी पुन्हा ओलांडली. मागील सात वर्षांचा हा उच्चांकी भाव आहे. मागील चार आठवड्यांमध्ये कच्च्या तेलाचे भाव सुमारे पंचवीस टक्क्यांनी वाढले. युनायटेड अरब इमिरेट्स या तेल उत्पादक देशातील तेल विहिरीवर हल्ला झाल्याने तेथील वातावरण तणावपूर्ण बनले, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव भडकले. रुपया चलन शुक्रवारच्या दिवशी .8 पैसे मजबुतीसह प्रती डॉलर 74.43 रुपया प्रती डॉलर किमतीवर बंद झाले; परंतु एकूण सप्‍ताहाचा विचार करता डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे 28 पैसे कमजोर झाला.

* व्होडाफोन-आयडिया या दूरसंचार कंपनीचे चालू आर्थिक वर्षाचे तिसर्‍या तिमाहीतील निकाल जाहीर. तिसर्‍या तिमाहीत तोटा 7234 कोटींवर पोहोचला. दूरसंचार कंपन्यांच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) 109 रुपयांवरून 115 रुपयेपर्यंत पोहोचला. तसेच रिलायन्स जिओचा नफा दोन टक्क्यांनी वाढून 3615 कोटींवर पोहोचला. तसेच प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) 143.6 रुपयांवरून 151 रुपयेपर्यंत पोहोचला.

* देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिसर्‍या तिमाहीतील निकाल जाहीर. रिलायन्सने आजपर्यंतचा सर्वाधिक नफा जाहीर केला. मागील तिमाहीच्या तुलनेत करोत्तर नफा (Profit after tax) 5.6 टक्क्यांनी, तर मागील वर्षाच्या तुलनेत करोत्तर नफा तब्बल 41.5 टक्क्यांनी वधारून थेट 18549 कोटींपर्यंत पोहोचला. तसेच एकूण नफा (Consolidated profit) 38 टक्क्यांनी वधारून 20549 कोटी झाला. कंपनीचा एकत्रित महसूल मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 54.3 टक्क्यांनी वाढून सुमारे 1 लाख 91 हजार कोटींपर्यंत पोहोचला.

* देशातील एफ.एम.सी.जी. क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरचे तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. निव्वळ नफ्यामध्ये 17 टक्क्यांची वाढ होऊन नफा 2243 कोटींवर पोहोचला. तसेच विक्रीमध्ये सुमारे 10.4 टक्क्यांची वाढ होऊन विक्री 12900 कोटींवर पोहोचली.

* बजाज फायनान्सचे तिसर्‍या तिमाहीचे धमाकेदार निकाल जाहीर. निव्वळ नफ्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 85 टक्क्यांची वाढ होऊन नफा थेट 2125 कोटींवर पोहोचला. आजपर्यंतचा हा सर्वाधिक नफा आहे. निव्वळ व्याज उत्पन्‍न (NII) देखील 40% वधारून सहा हजार कोटींवर पोहोचले. निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण मागील तिमाहीत असणार्‍या 1.10 टक्क्यांच्या तुलनेत 0.78 टक्क्यांपर्यंत खाली आले.

* अदानी उद्योगसमूहाची खाद्यतेल उत्पादक कंपनी अदानी विल्मर लिमीटेड आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरणार. 27 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत हा आयपीओ सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार. यासाठी किंमत पट्टा 218-230 रुपये निश्चित करण्यात आला आहे. सुमारे 3600 कोटींचा निधी आयपीओद्वारे उभा करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

* देशातील सर्वात मोठी रंगाची कंपनी एशियन पेंट्स तिसर्‍या तिमाहीचा नफा 18.5 टक्क्यांनी घसरून 1031.29 कोटींपर्यंत खाली आला. कंपनीचा महसूल मात्र 25.61 टक्क्यांनी वाढून 8527.24 कोटींवर गेला.

* रंग तयार करण्यासाठी प्रामुख्याने कच्च्या तेलाचा वापर होतो. कच्च्या तेलाची किंमत वर्षभरात सुमारे 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्यामुळे निव्वळ नफा खाली आल्याचे कंपनीचे स्पष्टीकरण.

* बजाज ऑटोची निराशाजनक कामगिरी. तिसर्‍या तिमाहीचा नफा 17 टक्क्यांनी घट होऊन 1430 कोटींपर्यंत खाली आला. कंपनीचा महसूल मात्र 8910 कोटींवरून 9022 कोटींपर्यंत पोहोचला.

* महाराष्ट्र बँकेची तिसर्‍या तिमाहीमध्ये नेत्रदीपक कामगिरी. तिसर्‍या तिमाहीत बँकेचा नफा दुपटीने (111टक्के) वाढून 325 कोटींवर पोहोचला. बँकेचा महसूल 3893 कोटींवर पोहोचला. तसेच निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 2.59 टक्क्यांवरून कमी होऊन 1.24 टक्क्यांवर खाली आले. निव्वळ व्याज उत्पन्‍न (NII) 16.90 वाढून 1527 कोटींवर पोहोचले. तसेच QIP च्या मार्गाने सुमारे पाचशे ते साडेसातशे कोटींचा निधी उभा करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.

* देशातील प्रमुख कुरिअर स्टार्ट अप कंपनी देल्हीवरी (Delhivery) आयपीओद्वारे लवकरच भांडवल बाजारात उतरणार. 7460 कोटींच्या आयपीओसाठी सेबीची मान्यता. 5000 कोटींसाठी नवीन समभाग आणि सध्याच्या गुंतवणूकदारांचे 2460 कोटींचे विक्रीसाठीचे समभाग असा एकूण सुमारे साडेसात हजार कोटींचा हा आयपीओ असणार आहे. याद्वारे कंपनीचे मूल्य सुमारे पाच ते साडेपाच अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या सॉफ्ट बँक, कारलाईल ग्रुप आणि चायना मोमेंट फंड या कंपनीतील प्रमुख गुंतवणूकदार आहेत. त्याचप्रमाणे आणखी एक स्टार्ट अप; (हॉटेल्सची शृंखला असणारे) ओयो हॉटेल्स आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरण्याची शक्यता आहे. कंपनीला सुमारे नऊ अब्ज डॉलर्सचे मूल्य अपेक्षित आहे.

* देशातील प्रमुख सिमेंट उत्पादक कंपनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा नफा 7.9 टक्क्यांनी वधारून 1710.14 कोटींवर पोहोचला. विक्रीदेखील 5.9 टक्क्यांनी वाढून 12984.93 कोटींवर पोहोचली.

* भारताची परकीय गंगाजळी 14 जानेवारी रोजी संपलेल्या सप्‍ताहात 2.229 अब्ज डॉलरनी वधारून 634.965 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.

Back to top button