cryptocurrencies : आर्थिक स्थैर्याला धोका! चीन नंतर आता रशियात क्रिप्टोकरन्सींवर बंदीचा प्रस्ताव | पुढारी

cryptocurrencies : आर्थिक स्थैर्याला धोका! चीन नंतर आता रशियात क्रिप्टोकरन्सींवर बंदीचा प्रस्ताव

मॉस्को; पुढारी ऑनलाईन

चीन, व्हिएतनाम, मोरोक्‍को, बोलेव्हियाने क्रिप्टोकरन्सींवर (cryptocurrencies) बंदी घातली आहे. भारतातही सर्व खासगी क्रिप्टोकरन्सींवर निर्बंध आणण्याचे विधेयक लवकरच संसदेत आणले जाणार आहे. आता रशियानेही क्रिप्टोकरन्सींवर बंदी घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आर्थिक स्थिरता, नागरिकांचे हित आणि आर्थिक धोरण सार्वभौमत्वाला धोका असल्याचे कारण देत रशियाच्या सेंट्रल बँकेने गुरुवारी क्रिप्टोकरन्सींच्या वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे.

आशियापासून ते अमेरिकापर्यंतच्या सर्व देशांच्या सरकारांना चिंता वाटत आहे की खासगीरित्या चालवली जाणारी आणि अत्यंत अस्थिर डिजिटल चलने त्यांच्या आर्थिक आणि चलनविषयक प्रणालीवरील नियंत्रण कमी करू शकतात.

रशियाचा गेल्या काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सींला ((cryptocurrencies) विरोध सुरुच आहे. क्रिप्टोकरन्सींचा वापर मनी लॉन्ड्रिंग अथवा दहशतवादासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी होऊ शकतो, अशी भिती रशियाने व्यक्त केली आहे. रशियाने २०२० मध्ये क्रिप्टोकरन्सींला कायदेशीर दर्जा दिला होता. पण पेमेंट म्हणून त्यांच्या वापरावर बंदी घातली होती.

वित्तीय संस्थांनी क्रिप्टोकरन्सींच्या माध्यमातून कोणतेही व्यवहार करण्यासापासून सावध रहावे यासाठी निर्बंध आणण्याचा प्रस्ताव रशियाच्या सेंट्रल बँकेने दिला आहे. क्रिप्टोकरन्सींची खरेदी किंवा विक्री व्यवहार रोखण्यासाठी यंत्रणा विकसित केली जावी, असे बँकेने प्रस्तावात म्हटले आहे.

या प्रस्तावित बंदीमध्ये क्रिप्टो एक्सचेंजचादेखील समावेश आहे. Cryptocurrency exchange Binance ने एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, ते नियमाला धरून काम करण्यास वचनबद्ध आहेत आणि आशा आहे की रशियन क्रिप्टो युजर्संचे हित जपण्यासाठी सेंट्रल बँकेशी संवाद साधू.

रशियात क्रिप्टोकरन्सींचा माध्यमातून वार्षिक उलाढाल ५ अब्ज डॉलरवर

रशियन लोकांची क्रिप्टोकरन्सींचा माध्यमातून होणारी वार्षिक उलाढाल ५ अब्ज डॉलर ($5 billion) एवढी आहेत, असे बँकेने म्हटले आहे. याआधी चीनने सर्व क्रिप्टो व्यवहारांवर पूर्णपणे बंदी घातली होती.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : सांगलीच्या मॅकॅनिकचा जुगाड! भंगारातून ३० हजारांत बनवली ‘फोर्ड कार’

Back to top button