सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिन्यात चितळी, ता. खटाव येथे युवकाला अडवून त्याचे अपहरण करत त्याच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, टॅब चोरत त्याद्वारे 80 हजार डॉलर की जे भारतीय चलनानुसार 64 लाख रुपयांवर दरोडा टाकणार्या 9 जणांच्या टोळीचा पर्दाफाश सातारा पोलिसांनी केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) ने केली असून अशा प्रकारचा क्रिप्टो करन्सी चा हा डिजिटल दरोडा ओपन होण्याची महाराष्ट्रातील पहिली घटना असल्याचे समोर येत आहे.
किरण गुलाब गावित (वय 32, रा.विद्यानगर, कराड), बिरजू ऊर्फ सतीश विलास रजपूत ऊर्फ कांबळे (वय 38, रा. शांतीनगर, इचलकरंजी), विशाल ऊर्फ सागर हरीभाऊ ननावरे ऊर्फ गुरव (वय 29, रा.सोमंथळी, ता.फलटण), दुशांत मनोहर पांढरपट्टे (वय 31, रा. निपाणी जि. बेळगाव, राज्य कर्नाटक), अभिजित सुरेश खंडागळे (वय 35, रा. राधानगरी, जि. कोल्हापूर सध्या रा. निपाणी), प्रवीण बाळासो शेवाळे (वय 26, रा. घोगाव, ता. कराड), बाळू तुकाराम भोसले (वय 31, रा.दुर्गामाता चौक, इचलकरंजी), किशोर अंबादास
निलंगे (वय 27, रा. शहापूर, इचलकरंजी), विशाल आनंदा शेवाळे (वय 30, रा. मलकापूर, ता. कराड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील काही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी ऋषीकेश राजेंद्र शेटे (रा. उंब्रज ता.कराड) यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबतची सर्व माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या गुन्ह्याची माहिती अशी आहे की, तक्रारदार ऋषीकेश शेटे व त्यांचा भाऊ हे दोघे क्रिप्टो करन्सीचे ट्रेडिंग करत असून हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ही घटना दि. 19 डिसेंबर रोजी घडली आहे.
तक्रारदार कारमधून आटपाडी येथून उंब्रजकडे येत असताना चितळी गावच्या हद्दीत संशयित आरोपींनी अडवले. संशयितांनी यावेळी मारहाण करत मोबाईल, टॅब, घड्याळ जबरदस्तीने चोरले. तसेच मोबाईल, टॅबचे पासवर्ड मागून घेत तक्रारदार यांचे पाय बांधून त्यांना पुसेसावळी गावच्या हद्दीत सोडून दिले.
तक्रारदार यांनी स्वत:ची सुटका करुन घेतल्यानंतर त्यांनी घरी येवून ते व्यवसाय करत असलेल्या क्रिप्टो करन्सी चा व्हॅलेट युजर आयडी व पासवर्ड टाकून पाहिले असता त्यांना धक्का बसला. कारण त्यांच्या त्या खात्यावर 80 हजार डॉलर (64 लाख) हे संशयित आरोपींनी दुसर्या व्हॅलेटवर ट्रान्सफर केल्याचे समोर आले.
या सर्व घटनेनंतर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या सर्व घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून एलसीबी पथकानेही तपासाला सुरुवात केली. गेली चार रात्रंदिवस तपास सुरु असताना या प्रकरणातील 9 संशयित आरोपींना अटक करण्यात एलसीबीला यश आले. संशयित सर्वांना पुणे, कराड, इचलकरंजी, निपाणी येथून ताब्यात घेतले आहे. संशयितांनी सर्व घडलेल्या घटनेची कबुली दिली असून पोलिस संशयितांकडे अधिक चौकशी करत आहेत.