Oscar Academy : ‘जय भीम’ चित्रपटाला ऑस्करचा विशेष सन्मान (video)  | पुढारी

Oscar Academy : 'जय भीम' चित्रपटाला ऑस्करचा विशेष सन्मान (video) 

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळ अभिनेता सुर्याच्या ‘जय भीम’ या चित्रपटाला ऑस्करकडून (Oscar Academy) विशेष सन्मान मिळालेला आहे. त्यामुळे ऑस्करकडून विशेष सन्मान मिळविणारा पहिला तामिळ चित्रपट ठरला आहे. या सन्मानामुळे भारतीयांची मान उंचावली आहे. जय भीम या चित्रपटाचा ऑस्कर अकॅडमीकडून विशेष सन्मान करण्यात आला आहे.

अमेझाॅन प्राईमवर ‘जय भीम’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जागतिक आणि भारतीय चित्रपटविश्वात चांगलीच चर्चा रंगली होती. सर्व स्तरातून त्या चित्रपटाचं कौतुकदेखील होत होतं. देशातील जातीय विषमता आणि आदिवासी जमातीला भोगाव्या लागणाऱ्या वेदना, त्याचबरोबर त्यांना जगावं लागणारं गुन्हेगारीचं जीवन, याचं वास्तव चित्रण चित्रपटात मांडण्यात आलं होतं.

ऑस्करच्या (Oscar Academy) अधिकृत यूट्यूब चॅनलेववर ‘जय भीम’ या चित्रपटाला स्थान दिले आहे. त्यावर चित्रपटातील काही सीन दाखवले जाणार असून दिग्दर्शक ग्नानवेल यांची मुलाखतही दाखवली जाणार आहे. ऑस्करच्या अधिकृत यूट्यूब चॅनलेववर ऑस्कर मिळालेल्या चित्रपटांचे काही सीन दाखवले जातात, त्याचबरोबर त्यांच्या लेखकांची आणि दिग्दर्शकांची मुलाखत दाखवली जाते. त्यात जय भीम चित्रपट दाखवला जाणार आहे.

या व्हिडिओच्या प्रारंभीच एका तुरुंगातून काही कैदी बाहेर येतानाचा सीन आहे. यावेळी तुरुंग अधिकारी शिक्षा भोगून बाहेर येत असलेल्या कैद्यांना त्यांची जात विचारताना दिसतात. तसेच जे कैदी खालच्या जातीचे आहेत त्यांना वेगळं उभं केलं जातं, नंतर स्थानिक पोलिसांकडून पैसे घेत त्यांच्या हवाली करतात. या कैद्यांवर स्थानिक पोलीस त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे गुन्हे दाखवून त्यांना पुन्हा अटक करताना दिसते, असे सीन दाखवून त्यापाठीमागची कथा दिग्दर्शकांतर्फे सांगण्यात आली आहे.

Back to top button