नाशिक पोलिस आयुक्त पटोलेंवर करणार का कारवाई? भूमिकेकडे भाजपचे लक्ष | पुढारी

नाशिक पोलिस आयुक्त पटोलेंवर करणार का कारवाई? भूमिकेकडे भाजपचे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या हेतूने राज्यात सर्वात प्रथम ना. राणे यांच्याविरोधात नाशिक शहरात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिले होते. या कारवाईनंतर पाण्डेय प्रसिद्धी झोतात आले. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानासाहेब पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजपने, आ. पटोले यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची पोलिस आयुक्त दखल घेत गुन्हा दाखल करतात की नाही, यावर भाजपने लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी ना. राणे यांच्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा नाशिकच्या सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी तक्रार केल्यानंतर रात्रीतून केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवल्याने पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय प्रकाशझोतात आले. त्याचप्रमाणे गुन्हा दाखल करण्यावर न थांबता, ना. राणे यांच्या अटकेसाठी नाशिकहून पोलिस पथक पाठवून पाण्डेय यांनी तत्परता दाखविली होती. त्यामुळे भाजपने पोलिस दबावात काम करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, पाण्डेय यांनी हा आरोप खोडला होता.

नाशिक : हेल्मेट कारवाईचा मुहूर्त उद्यापासून ; विनाहेल्मेट चालकांचे पोलिसांकडून समुपदेशन

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या पदाधिकार्‍यांनी शहर पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. आ. पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. त्याचप्रमाणे पोलिस दबावात काम करीत असल्याचा आरोप भाजपने राज्यस्तरावरून केला आहे. त्यामुळे आता पोलिस आयुक्त पाण्डेय यांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेकडे भाजपसह नाशिककरांचे लक्ष लागून आहे. ना. राणे यांच्याप्रकरणी दाखविलेली कर्तव्यदक्षता, तत्परतेची भूमिका आ. पटोले यांच्याविरोधातही बघायला मिळेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.

भाजप पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल
सातपूर : भाजपच्या वतीने सातपूर परिसरात जोडे मारो आंदोलनात सहभागी असलेल्या भाजपा आमदारांसह वीस ते पंचवीस कार्यकत्र्यांवर सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने नाशिक भाजपने अशोकनगर परिसरात जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते. परंतु या आंदोलनाला परवानगी नसतानाही तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिस ठाण्यात आ. सीमा हिरे, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्ते यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्ही शहर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिस आ. पटोले यांच्या चित्रफितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते पुढील दिशा ठरवतील. पोलिसांच्या भूमिकेवर लक्ष आहे.
– गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप

हेही वाचा :

Back to top button