NZ vs BAN : बांगलदेशचा तीन दिवसात दोनदा ऑलआऊट, न्यूझीलंडचा १ डाव ११७ धावांनी विजय | पुढारी

NZ vs BAN : बांगलदेशचा तीन दिवसात दोनदा ऑलआऊट, न्यूझीलंडचा १ डाव ११७ धावांनी विजय

क्राइस्टचर्च, पुढारी ऑनलाईन : क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा एक डाव आणि 117 धावांनी पराभव केला. यासह उभय संघांमधील दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. किवींनी पहिल्या डावात 6 बाद 521 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात 126 धावा आणि फॉलोऑन खेळताना दुसऱ्या डावात 278 धावा केल्या. द्विशतकी खेळी साकारणारा न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला सामनावीर आणि डेव्हन कॉनवेला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. (NZ vs BAN)

बांगलादेशने माऊंड मुंगुनई येथे पहिली कसोटी जिंकून सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर क्राइस्टचर्चमध्येही त्यांचा संघ उत्कृष्ट कामगिरी करेल अशी शक्यता होती. पण दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांचा टीकाव लगला नाही. किवी गोलंदाजांनी तीन दिवसातच बंगलादेशचा दोनवेळा ऑलआउट केला. आणि दुसरी कसोटी खिशात घालून मालिका बरोबरीत सोडवली. क्राइस्टचर्च कसोटीत किवी खेळाडूंचा दबदबा दिसला. त्याचा परिणाम असा झाला की न्यूझीलंडने 5 दिवसांचा कसोटी सामना अवघ्या 3 दिवसांत संपवला आणि बांगलादेशचा एक डाव आणि 117 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. (NZ vs BAN)

बांगलादेशला पहिल्या डावात 126 धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 27 धावांवर संघाला पहिला धक्का बसला. शादमान इस्लाम 21 धावा करून बाद झाला तर नजमुल हुसेन शांतोही 29 धावा करून बाद झाला. यावेळी त्यांची धावसंख्या 71 होती. (NZ vs BAN)

105 धावांवर बांगलादेशने तिसरी विकेट गमावली. यानंतर त्यांच्या फलंदाजीला गळती लागली. त्यांचा निम्मा संघ 128 धावांतच तंबूत परतला. मात्र, इथून पुढे सहाव्या विकेटसाठी नुरुल हसन आणि लिटन दास यांच्यात 101 धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. नुरुल हसनने 36 धावा केल्या तर लिटन दासने 114 चेंडूत 102 धावांची सुरेख शतकी खेळी साकारली. ही जोडी फुटल्यानंतर खालच्या फळीतील एकाही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे बांगलादेशचा संपूर्ण डाव 278 धावांवर आटोपला आणि त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटचा कसोटी सामना खेळत असलेल्या न्यूझीलंडच्या रॉस टेलरने त्याच्या अखेरच्या कसोटीत विकेट घेतली. त्याने इबादत हुसेनला बाद करून बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने 4 आणि नील वॅगनरने 3 बळी घेतले. (NZ vs BAN)

Image

तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 521 धावा केल्या. किवी संघाकडून कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे यांनी सर्वाधिक धावा केल्या. लॅथमने 252 धावा करत द्विशतक झळकावले, तर दुसरीकडे कॉनवेनेही 109 धावांची शानदार खेळी करत शतक झळकावले. (NZ vs BAN)

Back to top button