रेल्वेच्या डब्यात बसून चाखा खाद्यपदार्थांची चव | पुढारी

रेल्वेच्या डब्यात बसून चाखा खाद्यपदार्थांची चव

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सीएसएमटी स्थानकात येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांना आणि पर्यटकांना आता रेल्वेच्या डब्यात बसूनच खादयपदार्थांची चव चाखता येणार आहे. मध्य रेल्वेकडून रेस्टॉरंट ऑन व्हील ही संकल्पना राबविण्यात आली आहे. वापरात नसलेल्या डब्यांचे रुपांतर उपाहारगृहात करण्यात आले असून सीएसएमटीच्या 18 नंबर प्लॅटफॉर्मबाहेर हे रेस्टॉरंट ऑन व्हील सोमवारपासून प्रवासी,पर्यटकांच्या सेवेत खुले केले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी या रेस्टॉरंट ऑन व्हीलचे निरीक्षण केले.

सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे स्टॉल्स असले तरी बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल, असे रेस्टॉरंट नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांना रेल्वे हद्दीतच चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्यास उत्पन्नही मिळेल, या उद्देशाने भारतीय रेल्वेने रेस्टॉरंट ऑन व्हील ही संकल्पना राबवली आहे.

मध्य रेल्वेने ही संकल्पना उचलून धरत सीएसएमटी स्थानकात त्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. वापरात नसलेल्या एका जुन्या रेल्वे डब्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले आहे. यासाठी मध्य रेल्वेने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट दिले.

या स्थानकात होणार रेस्टॉरंट ऑन व्हील

सीएसएमटी स्थानकांनतर आता एलटीटी,कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी सह पश्चिम रेल्वे मार्गावरील बांद्रा टर्मिनस,बोरीवली आणि सुरत स्थानकातही रेस्टॉरंट ऑन व्हील संकल्पना राबविण्यात येणार आहे. याशिवाय मध्य रेल्वेच्या नागपूर, आकुर्डी, बारामती, चिचवाड आणि मिरज स्थानकात निविदा काढण्यात आली आहे.

* भारतीय रेल्वे या थीमवर डब्याच्या आतील भागातील रंगकाम,सजावट .

* रेल्वेच्या डब्यात 40 जणांना बसण्याची सोय .

* दर वर्षी 42 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

* व्हेज आणि नान व्हेज दोन्हीचा आस्वाद घेता येणार.

* मुंबई दर्शनाकरिता येणार्‍या पर्यटकांना याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न.

आता रेल्वेच्या पॉड हॉटेलमध्ये रहा

पश्चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर देशातील पहिल्या पॉड हॉटेलचा शुभारंभ दिवाळीच्या मुहुर्तावर करण्याचा निर्णय इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) घेतला आहे.लांब पल्ल्यांच्या मेल – एक्सप्रेस किंवा उपनगरीय रेलवेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना या ठिकाणी काही तासांसाठी राहण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

विशेष म्हणजे हे पॉड हॉटेल सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असेल. त्याचबरोबर देशी-विदेशी पर्यटकांना राहण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. दरम्यान, पॉड हॉटेलची संकल्पना सर्वप्रथम जपान देशात मांडण्यात आली. जपानने प्रवाशी, कर्मचार्‍यांच्या विश्रांतीसाठी पॉडची निर्मिती केली.

* 284 चौरस मीटर जागेत रेल्वे पॉडची उभारणीचे काम सुरू आहे.

* एका पॉडसाठी साधारणपणे 7 लाख रुपये खर्च.

* पॉडमध्ये एकूण 20 कॅप्सूल बेडची व्यवस्था .

* तासांनुसार दर आकारण्यात येतील. दरपत्रक लवकरच जाहीर करणार.

* दिवाळीपूर्वी अर्थात 31 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर यापैकी एका तारखेला या पॉड हॉटेलचा शुभारंभ करण्याचे नियोजन.

Back to top button