ठाणे : सहयाद्री पर्वतरांगात चार ब्लॅक पॅथर | पुढारी

ठाणे : सहयाद्री पर्वतरांगात चार ब्लॅक पॅथर

ठाणे; विश्वनाथ नवलू :  सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पाच पट्टेरी वाघांबरोबर चार ब्लॅक पँथर या दुर्मीळ प्रजाती आढळल्यामुळे प्राणीसंपदेच्या समृद्धतेला नवे आयाम मिळाले आहेत. काळा बिबट्या हा अत्यंत दुर्मीळ बिबट्या असून त्याचे निसर्गातील वास्तव्य हे जिल्ह्यातील जंगलाचे परिपूर्णतेचे सकारात्मक प्रतीक आहे. कोकण हा प्रदेश सस्तन प्राणी स्थानिक आणि स्थलांतरित होऊन येणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी अशा किती तरी पशु-पक्षी आणि प्राण्यांनी संपन्न आहे. वन पर्यटकांना मनसोक्त आनंद देणारे आणि वन्यजीव अभ्यासकांचे औत्सुक्य अजून वाढवणारे हे क्षेत्र गडकिल्ल्यांच्या पर्यटनासाठीही आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे मानवी उपद्रव व घुसखोरी कमी असल्याने हा परिसर वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळजवळ एका पाण्याच्या टाकीत वन विभागाला दुर्मीळ म्हणून ओळखला जाणारा ब्लॅक पँथर सापडला. यापूर्वीही ब्लॅक पॅंथरच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले होते. सिंधदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात भैरवगड ते रांगणागड या सुमारे १५ ते २० कि. मी. सह्याद्री पट्ट्यात हे ब्लॅक पँथर सापडले आहेत. यामुळे या जंगलाच्या समृद्धतेचा आणखी एक पुरावा मिळाला आहे..
पश्चिम घाटात पट्टेरी वाघांचे अस्तित्वही आढळले आहे. सिंधुदुर्गातील आंबोली, हिरण्यकेशी येथे यापूर्वी पट्टेरी वाघ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कुडाळ तालुक्यातील भैरवगड परिसरात ब्लॅक पँथर ही दुर्मीळ जात आढळून आली असून या भागात आता पट्टेरी वाघांबरोबरच दुर्मीळ ब्लॅक पँथरचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे..

एकंदरीतच या ‘ब्लॅक पँथर’मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेत भर पडली आहे. हा ‘ब्लॅक पँथर’ ताडोबा राष्ट्रीय उद्यान, सिंधुदुर्गात तिलारी, आंबोली यासारख्या घनदाट जंगलात सापडतो. मात्र, गोवेरीसारख्या कमी जंगलाच्या ठिकाणी मिळालेल्या ब्लॅक पँथरमुळे जिल्ह्यात अशा दुर्मीळ वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित व पोषक वातावरण असून येथील जैवविविधता वैभवशाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी पश्चिम घाटात समावेश असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी, माणगाव, भैरवगड, दाजीपूर या परिसरात दुर्मीळ प्राण्यांचे अस्तित्व आढळले होते. यामध्ये शेकरू, हरीण, सांबर, पट्टेरी वाघ, गवे, खवले मांजर, रानडुक्कर, लंगूर, ब्लॅक पँथर या प्राणी जातींचा समावेश होता. पट्टेरी वाघाच्या पाउलखुणा तिलारी धरण परिसर आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे येथील सह्याद्री पट्ट्यात दोन वर्षांपूर्वी आढळल्या आहेत. आंबोली- हिरण्यकेशी परिसरात पट्टेरी वाघ असल्याचा पुरावा वनखात्याला कॅमऱ्यात टिपले गेले आहे. हा पट्टेरी वाघ आंबोली – हिरण्यकेशी जंगल भागात असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सह्याद्री पट्ट्यात राधानगरी ते तिलारी घाट परिसरात जे कोल्हापूर, सिंधुदुर्ग या सह्याद्रीच्या जंगल भागात गेल्या काही वर्षांपासून पट्टेरी वाघ आपले बस्तान मांडून आहे.

Back to top button