चिपळूण: गद्दारांना शिवसेनेचे दरवाजे बंद?शिवसेना सचिव व खा. विनायक राऊत यांची स्पष्टोक्‍त | पुढारी

चिपळूण: गद्दारांना शिवसेनेचे दरवाजे बंद?शिवसेना सचिव व खा. विनायक राऊत यांची स्पष्टोक्‍त

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा शिवसेना सोडून जे आमदार गेले ते बंडखोर व गद्दारच आहेत. त्यांना यापुढे पक्षात कधीही घेतले जाणार नाही. त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. शिवसेनेचे नाव घेण्याचीही नैतिकता त्यांच्याकडे राहिलेली नाही. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हायजॅक करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तेव्हा बंडखोर आमदारांमध्ये हिंमत असेल, तर आम्ही शिवसेना सोडली म्हणून त्यांनी जाहीर करावं, असे खुले आव्हान शिवसेना पक्षाचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी येथे दिले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या परशुराम घाटाच्या पाहणीसाठी खा.राऊत चिपळुणात आले असता त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद
साधला. ते म्हणाले, अख्ख्या देशाला लांच्छनास्पद ठरेल असे राजकारण भाजप पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडले. ईडी, आयटी, सीबीआय आणि खोक्याला दुर्दैवाने शिवसेनेचे 40 आमदार बळी पडले. सत्तेची लालसा व मुख्यमंत्रिपदाचा हव्यास त्याला कारणीभूत ठरला. त्यासाठी कित्येक कोटींची उधळण झाली. प्रत्येकी 50 ते 70 कोटी दिल्याची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात चार हजार कोटींहून अधिक रुपयांचा बाजार मांडला गेला, असा थेट आरोप खा. राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले, ईडी, सीबीआयचा दुरुपयोग केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून केला गेला. जुनी प्रकरण शोधून काढायची आणि त्याचा फायदा उठवायचा. संतोष बांगर हेदेखील भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकले. अशा राजकारणाने लोकशाही शिल्लक राहणार नाही. शिवसेना कशी संपवता येईल, यासाठी भाजपने हा डाव रचला आहे. मात्र आता हिंमत असेल, तर त्यांनी पोट निवडणुकीला सामोरे जावे. आमची त्यासाठी तयारी आहे. शिवसेना पक्षाची कार्यकारणी आजही तितकीच मजबूत आहे. तरीही ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी पक्षात थांबू नये असे खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. कारण हा निष्ठावंतांचा पक्ष असून अशा लोकांनाच यापुढे घेऊन पक्ष काम करणार आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधींना विकत घेऊन शिवसेना संपणार नाही. मात्र, याहीपुढे जाऊन भाजपने या बंडखोरांना हाताशी धरून शिवसेनेला संपविण्याचा कुटील डाव खेळला आहे. मात्र, तो कधीही यशस्वी होणार नाही. या घाणेरड्या राजकारणामुळे देशभरातून तीव्र भावना व्यक्‍त होत आहेत. अशा पद्धतीने राजकारण झाले तर लोकशाही शिल्लक राहाणार नाही. घटनेची गळचेपी करून आणि घटना विस्कटून हे प्रकार होणार असतील तर जनता त्याला माफ करणार नाही. या विरोधात अनेक राज्यातील वकील एकत्र येऊन राष्ट्रपतींकडे या संदर्भात मांडणार आहेत, असे खा. राऊत यांनी सांगितले. हे सर्व एका दिवसात घडलेले नाही. गेले सहा महिने हा प्रकार सुरू होता. या बाबत पक्षप्रमुख ठाकरे यांना कल्पना होती. तब्बल पाचवेळा या बाबत विचारणा झाली. मात्र, खोट्या शपथा घेण्यात आल्या.
आता हिंमत असेल तर त्यांनी आपण भाजपमध्ये गेल्याचे उघडपणे सांगावे. या प्रकरणात भाजप शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

केसरकर, सामंत आयत्या बिळातील नागोबा..

उदय सामंत व दीपक केसरकर हे बाहेरूनच सेनेमध्ये आले होते. ते आयत्या बिळावरील नागोबा आहेत. तत्त्वाचे बाजारीकरण करणार्‍यांनी तत्त्व शिकवू नयेत. मुळात शिवसेनेनेच त्यांना मोठे केले. हिंमत असेल तर त्यांनी आपण सेना सोडली हे जाहीर सांगावे. संभ्रम निर्माण करू नये. रत्नागिरी येथे 10 जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा केवळ निष्ठावंतांसाठी असणार आहे. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना या मेळाव्यात येण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असा टोला खा. विनायक राऊत यांनी आ. उदय सामंत यांना लगावला

Back to top button