नाणीज : विधवा प्रथा बंदीचा निर्णय कौतुकास्पद : उदय सामंत | पुढारी

नाणीज : विधवा प्रथा बंदीचा निर्णय कौतुकास्पद : उदय सामंत

नाणीज : पुढारी वृत्तसेवा येथील विधवा प्रथा बंद करण्याच्या निर्णयाचे मी कौतुक करतो. पुरोगामी आधुनिक विचारसरणीचा निर्णय या ग्रामपंचायतीने घेतला आहे, असे गौरवोद‍्गार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे काढले.

ग्रामपंचायतीच्या ठरवानंतर ग्रामस्थांचे कौतुक करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघात ही खूप चांगली गोष्ट होत आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मला मुंबईला असताना ही बातमी समजली. त्यामुळे सर्वांचे कौतुक करण्यासाठी इथे आलो आहे. हा धाडसी आणि अतिशय आधुनिक विचार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे अभिनंदन करतो.

ते म्हणाले,आता हा निर्णय फक्त कागदावर न राहता या निर्णयाची अंमलबजावणी घरोघरी व्हायला हवी. प्रत्येक महिलेने दुसर्‍या महिलेचे आयुष्य कसे सुधारेल, यासाठी पाऊल उचलायला हवे. घरोघरी ही प्रथा मनापासून बंद व्हायला हवी तरच आपण पुढे चांगल्या प्रकारे एकजुटीने कार्य करू.

तालुक्यातील ही पहिली ग्रामपंचायत आहे, जिने विधवा प्रथा बंद केली आहे. याचे सर्वांनी स्वागत करून आपण सर्वांनी ही प्रथा आता फक्त कायदा करूनच नव्हे तर मनापासून नष्ट करायला हवी. घरोघरी प्रत्येकाने निर्णय घ्यायला हवा. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार मला होता आले याचा मला खूप अभिमान आहे.

मंत्री उदय सामंत यांचे स्वागत आणि औक्षण विधवा भगिनींनी केले. याप्रसंगी मा. सामंत यांनी विधवा भगिनींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्याचबरोबर त्यांना वटवृक्षाचे रोपही भेट दिले. याप्रसंगी नाणीज येथील रहिवाशांचे प्रश्न आणि गावातील काही समस्यांबाबत सुद्धा ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यावर मी लवकरच या सर्व प्रश्नांची पूर्तता करतो, असे आश्वासनही दिले.

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, उपजिल्हाप्रमुख महेश माप, विभाग प्रमुख सचिन सावंत, महिला संघटक विद्या भोंगले, संस्थानाचे सी ई.ओ. विनोद भागवत त्याचबरोबर नाणीजचे सरपंच गौरव संसारे, उपसरपंच राधिका शिंदे, गावचे पोलिस पाटील नितीन कांबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button