

उदगाव येथे सांगली कोल्हापूर राज्य महामार्ग बंद झाला आहे. उदगावजवळच्या रेल्वे ओव्हरब्रिज जवळ चार फूट पाणी आल्याने सांगली कोल्हापूर वाहतुक बंद करण्यात आली आहे. या पूर्वी पुरामुळे सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारा बायपास मार्ग आधीच बंद करण्यात आला होता.
सांगली कोल्हापूर राज्य महामार्ग हा वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टिने दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्वाचा आहे.
ऑक्सिजन, औषधे, गॅस, पेट्रोल, डिझेल यासह जीवनाश्वयक वस्तू येणारा उदगाव (ता.शिरोळ) येथून असलेला सांगली-कोल्हापूर राज्य महामार्ग शनिवारी (दि.२४) सायकांळी सहाच्या सुमारास बंद झाल्याने सर्व वाहतुक ठप्प झाली.
सांगली जिल्हयाला जोडणारे किणी, पेठवडगांव, निलेवाडी, अर्जुनवाड, कुंभोज येथील मार्ग शुक्रवारी बंद झाल्याने सांगली जिल्हयात जाण्यासाठी उदगाव येथील एकमेव महामार्ग सुरु होता. पावसाने उसत दिली असली तरी महापुराचे पाणी वाढल्याने शनिवारी सायकांळी सहा वाजता सांगली कोल्हापूर महामार्ग बंद झाला.
त्यापुर्वी जयसिंगपूर पोलिसांनी ऑक्सिजन, औषधे, गॅस, पेट्रोल, डिझेलची वाहने बंदोबस्तात उदगांव येथे आणण्यात आली. पाणी वाढत असल्याने अनेक मोटरसायकली पाण्यातून वाहत जात होत्या. त्यानंतर घटनास्थळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाहणी केली.
सहा वाजता पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे राज्य महामार्ग बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे उदगावपासून चिपरीपर्यत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तर जयसिंगपूर शहरात मोठया प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.
शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे. उदगाव येथील सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग पहाटे ४ वाजता पाण्याखाली गेला आहे.
याबरोबरच तालुक्यातील इतर सांगली-कोल्हापूर बायपास मार्गासह जिल्हा व राज्य ८ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त गावात आता साहित्याची बांधाबांध सुरू आहे.
सद्या कृष्णा नदीच्या पाण्यामुळे उदगाव येथील मोठ्या ओढ्यावर असलेल्या सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे.
उदगांव-जयसिंगपूर रेल्वे स्टेशनरस्ताही पहाटे बंद झाला आहे.
वारणा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे दानोळी-कोथळी, दानोळी- कवठेसार मार्ग बंद झाला असून कवठेसार गावाचा संपर्क तुटला आहे.
पंचगंगा नदीच्या पाण्यामुळे नांदणी-शिरढोण, नांदणी-धरणगुत्ती व नांदणी-कुरुंदवाड मार्ग बंद झाला आहे.
हेरवाड-अब्दुललाट, शिरढोण-कुरुंदवाड हे देखील मार्ग पाण्याखाली गेले आहे.