शिरोळ तालुक्यातील ४५ हजारांहून अधिक लोकांचे स्थलांतर | पुढारी

शिरोळ तालुक्यातील ४५ हजारांहून अधिक लोकांचे स्थलांतर

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा :

शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा या नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील ४० हुन अधिक गावात पाणी शिरले आहे. शनिवारी दुपारपर्यत ८ हजाराहून अधिक कुटुंबातील ४५ हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतर करण्यात आले आहे. त्याबरोबर तब्बल १२ हजाराहून अधिक जनावरे सुरक्षितस्थळी आणण्यात आली आहेत.

शुक्रवारपासून जिल्हा, तालुका व आरोग्य राज्यमंत्री यांच्याकडून पूर आलेल्या गावातील नागरिकाना स्थलांतर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. शिरोळ तालुक्यातील चिंचवाड, खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, उदगांव, कुरुंदवाड, शिरोळ, दानवाड, बस्तवाड, मजरेवाडी, नृसिंहवाडी, नांदणी कनवाड, कुटवाड, घालवाड, अर्जुनवाड, उमळवाड, कवठेसार, दानोळी यासह अन्य गावात पुराचे पाणी शिरले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी ठेवण्यासाठी आर्मी, एनडीआरएफ, रेस्क्यूकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

पूरग्रस्त नागरिकांना टाकळीवाडी साखर कारखाना, दत्त साखर कारखाना, शिरोळ पद्मराजे विद्यालय, उदगांव टेक्निकल हायस्कूल, नांदणी, जयसिंगपूर, कवठेगुलदं यासह अन्य गावात ठिकाणी ठेवण्यात आले. प्रत्येक गावात तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्याकडूनही मदत कार्य सुरू आहे.

गावे पडली ओस

गावात पुराचे पाणी आल्याने नदीच्या अगदी जवळ असलेल्या नागरिकांचे शुक्रवारी रात्री स्थलांतर झाले. त्यामुळे अनेक गावे ओस पडल्याचे चित्र आहे. तर स्थलांतर झालेल्या नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. विविध औषधांचा पुरवठाही करण्यात येत आहे.

३ लाख ५० हजारने क्यूसेसने विसर्ग : यड्रावकर

शिरोळ तालुक्यात महापुराचा धोका वाढत असल्याने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कर्नाटक पाटबंधारे विभागाचे मुख्य सचिव यांच्याशी शुक्रवारी मध्यरात्री २ वाजता चर्चा केली. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजलेपासून ३ लाख ५० हजार क्यूसेसने अलमट्टी धरणातून विसर्ग केल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुढारी बोलताना सांगितले.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : गाई पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट

Back to top button