वारणा नदीवरील महापुराची परिस्थिती कायम, चांदोली परिसरात अतिवृष्टी | पुढारी

वारणा नदीवरील महापुराची परिस्थिती कायम, चांदोली परिसरात अतिवृष्टी

शिराळा; पुढारी वृत्तसेवा – वारणा नदीवरील महापुराची परिस्थिती कायम आहे. चांदोली परिसरात अतिवृष्टी सुरु आहे. देववाडी गावास पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने गावाशी संपर्क तुटला आहे. नदीवरील गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

अधिक वाचा 

वारणावती येथे येथे २८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणामधून विसर्ग कमी केला आहे. १९७५० क्युसेक्स एवढा केला आहे.

नदीकाठावरील गावांना सावधानतेचा ईशारा देणेत आला आहे. तहसीलदार गणेश शिंदे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. खराडे येथे गावाशेजारी जमिनीचे भूसंख्लन झाले आहे. यामध्ये जीवीत वा वित्तहानी झाली नाही. शिराळा येथील तोरणा व मोरणा नदीचे पुराचे पाणी ओसरू लागले आहे.

अधिक वाचा – 

तोरणा नदीस आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. लगतच्या घरातून पाणी शिरले होते. पुल गल्ली येथील रस्ता या मुळे वाहून गेला असून गोपाल कृष्ण पथाकडे जाणे रस्ता बंद झाला आहे.

मुलाणी गल्लीच्या बाजूचा रस्ता वाहून गेला आहे. तर येथे असणारे तारेचे कुंपण वाहून गेले आहे. मोठमोठी झाडे वाहून आली आहेत. तालुक्यातील अनेक गावातील वीज खांब पडले आहेत.

अनेक गावाचा वीज पुरवठा व पाणी पुरवठा बंद

अनेक ट्रान्सफॉर्मर पाण्यात बुडाले असल्याने अनेक गावाचा वीज पुरवठा व पाणी पुरवठा बंद आहे. शिराळा येथे ही हीच परिस्थिती असल्याने गेले तीन दिवस पिण्याचे पाणी आले नाही. तालुक्यातील एसटी सेवा बंद आहे.

शिराळा तालुक्यातील वारणा नदीचे पाणी अजूनही पात्राबाहेर आहे. नदीकाठच्या गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे मोहरे, चरण, आरळा, सोनवडे, सांगाव, पुनवत, मांगले, देववाडी, कांदे, कोकरूड, बिळाशी, चिंचोली, प. त. वारुणी या गावातील १८४२ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

२२२८ जनावरांचे स्थलांतर

शिराळा तालुक्यातील उत्तर भागामध्ये पावसाचा जोर प्रचंड असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

वाकूर्डे बुद्रुक झोळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या महापुरामुळे ओढ्यावरील पूल तुटून पाईप वाहून गेलेल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून येथील नागरिकांचा वाकूर्डे बुद्रुक गावाशी असलेला संपर्क तुटला आहे.

तसेच दळण-वळणाची पर्यायी व्यवस्था नसल्याने व एकमेव असलेला पूल वाहून गेल्याने येजा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाना डेअरीपर्यंत दूध पोहचवता न आल्याने येथील दुधाचे प्रचंड नुकसान झाले. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.

संपूर्ण वस्तीच्या आजूबाजूला ओढे असलेने नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. शिराळा तालुक्यातील कापरी येथील सुजय नगरला जाणारा पूल निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे तुटला आहे.

सुजय नगर वाहतूक बंद झाली आहे. तालुक्यात पाचगणी ते बुरबुशी रस्ता तुटला आहे वाहतूक बंद झाली आहे.

शिराळा मांगले रोडवरील गोरक्षनाथ मंदीर जवळील पूल पूरामुळे खचला आहे. वाकुर्डे बुद्रूक ते येळापुर रस्त्यावरील व्हरडोबा खिंडीत दरड कोसळून रस्ता पूर्ण बंद झाला आहे.

अतिवृष्टीमुळे वाकुर्डे बु व आसपासच्या भागात अनेक ठिकाणी दरड कोसळणे, रस्ते खचणे तसेच पूल खचने अश्या दुर्घटना झाल्या आहेत.

त्यात वाकुर्डे वरून झोळे वस्तीकडे जाणारा रस्ता खचला आहे. वाकुर्डे वरून पदळवाडी ला जाणारा रस्ता खचला आहे.

गावच्या मध्यभागी असलेल्या वाकेशवर मंदिर व चौकाला सलग दोन दिवस ४-५ फूट उंच पाण्याने वेढा घातला होता.

गावातील वाहतूक व संपर्क दोन दिवस ठप्प झाली होती.

शिराळा मार्गे वाकुर्डे बु आणि तेथून येळापूर, शेडगेवाडी ला जाणारा रस्ता सध्या बंद झाला आहे.

वाकुर्डे ते येळापूर च्या घाटामध्ये व्हरडोबाची खिंड आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे डाव्या बाजूचा आखा डोंगर भुसखलन होऊन घसरला आहे व त्याने रस्ता पूर्ण बंद केला आहे.

वाकुर्डे बु मार्गे येळापूर, शेडगेवाडी, चांदोली तसेच कराडला जाणारी वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button