अजित पवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर | पुढारी

अजित पवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्यात आली. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली.

अधिक वाचा – 

या वेळी अजित पवार म्हणाले, पुरग्रस्तांना गव्हाऐवजी तांदूळ, डाळ आणि रॉकेल दिले जाणार आहे. हेलिकॉप्टरमधून बोटीनं डाळ, तांदूळ व पाण्याच्या बाटल्या पोहोचवल्या जातील. पूरग्रस्तांना अन्नधान्य व पिण्याचे पाणी पोहोचवण्यास सरकारचं प्राधान्य आहे.

पूरग्रस्तभागात शिवभोजन केंद्रांची संख्याही वाढवली जाईल. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावेत, आदेशाची वाट पाहू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे त्‍यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत ७६ मृत्यू झाले असून, ५९ लोक बेपत्ता आहेत, तर ३८ जखमींवर उपचार सुरू आहेत.

७५ जनावरेही दगावली आहेत. राज्यातील ९० हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

अधिक वाचा- 

लष्कर, नौदल, हवाई दल, एनडीआरएफची मदत मिळत असून, मुख्यमंत्र्यांसह आपण स्वत: संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. हवामान विभागाचे बरेचसे अंदाज आता खरे ठरताहेत.

वशिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने पर्यायी रस्त्याचे काम वेगाने करणार. सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ते म्‍हणाले.

लष्करी मदतीसाठी आपण स्वत: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आपत्तीग्रस्तांचा बचाव, मदत व पुनर्वसनाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा, एनडीआरएफ, लष्कर, नौदल, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्यानं युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य करीत आहेत.

मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना

जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आपत्तीग्रस्त नागरिकांना निवारा, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, औषधे आदी मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या.

संरक्षण मंत्रालयाशी समन्वयासाठी नोडल ऑफिसर म्हणून मदत व पुनर्वसन सचिव असिम गुप्ता यांच्यावर जबाबदारी आहे.

अधिक वाचा- 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवांकडून सातत्याने आपत्कालिन स्थितीचा आढावा घण्यात आला. स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आहेत, असे पवार यांनी सांगितले.

ajit pawarलोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले.

पवार पुढे म्हणाले, कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत.

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झालं असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे.

कोल्हापुरात पाणीपातळी धोका पातळीच्यावर आहे. धरण खोलीकरणाचा पूरस्थितीशी काहीही संबंध नाही. जर्मनी, चीनमध्येही प्रचंड पूर आले, तिथंही हानी झाली. प्रचंड पाऊस झाल्यास अशी परिस्थिती ओढवते. राजकारण न करता सर्वांनी मदत करावी, असे आवाहनही त्‍यांनी केले.

महाडमध्ये तिळये गावाजवळ काल परवा हेलिकॉप्टरही उतरवणे शक्य नव्हते. ‘व्हीव्हीआयपीं’नी दौरा केल्यास प्रशासन त्यातच अडकते, त्यामुळे मी पुणे जिल्ह्यातच थांबणार असल्याचे त्‍यांनी सांगितले.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात : Flooded Kolhapur City, Drone Video

Back to top button