चीनच्या भिंतीबाबतचे गैरसमज | पुढारी

चीनच्या भिंतीबाबतचे गैरसमज

जगातील आश्चर्यांच्या यादीत चीनच्या भिंतीचा समावेश होतो. उत्तर चीनमध्ये बांधलेल्या या भिंतीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे. या भिंतीच्या सर्वात प्राचीन भागाचे बांधकाम अडीच हजार वर्षांपूर्वीचे असले तरी भिंतीचा सर्वात प्रसिद्ध भाग सुमारे 500 वर्षांपूर्वी बांधला गेला. या भिंतीची लांबी 21 हजार 196 किलोमीटर इतकी आहे. जगात सर्वाधिक चर्चिल्या जाणार्‍या या भिंतीबद्दल काही अफवादेखील आहेत. या अफवा किंवा गैरसमजांची ही माहिती…

चंद्रावरून दिसणारी भिंत

अमेरिकन कलाकार लेरॉय रॉबर्ट रिप्ले यांनी त्यांच्या ‘बिलिव्ह इट ऑर नॉट’ या कार्यक्रमात असं म्हटलंय की, मानवाने बांधलेली ही सर्वात शक्तिशाली भिंत असून ही एकमेव रचना आहे, जी मानव चंद्रावरून पाहू शकतो. पण, अर्थातच याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. चीनचे प्रख्यात सिनोलॉजिस्ट (इतिहास, भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करणारी व्यक्ती) आणि ‘सायन्स अँड सिव्हिलायझेशन इन चायना’चे लेखक जोसेफ नीडहॅम सांगतात की, खगोलशास्त्रज्ञांच्या मते, ही अंतराळातून दिसणारी एकमेव भिंत आहे. मात्र हे मिथक असल्याचं अंतराळवीरांनी दाखवून दिलं. खरी गोष्ट 2003 मध्ये समोर आली. चीनने पहिले अंतराळ यान सोडले. खगोलशास्त्रज्ञ यांग लिवेई यांनी सांगितलं की, त्यांना अंतराळातून काहीही दिसत नव्हतं!

सलग बांधलेली भिंत

खरं तर ही एकसलग बांधलेली भिंत नसून, अनेक भिंती जोडून तयार झालेली महाकाय भिंत आहे. त्यात अनेक विभाग आहेत. त्यातील काही मोजक्याच वास्तू आपल्या भव्य वास्तुकलेने पर्यटकांना आकर्षित करतात. या भिंतीचे काही भाग द़ृष्टिआड झाले असून, त्यांचीही दुरवस्थाही झाली आहे. या भिंतीवरून चालणार्‍यांना या भिंतीकडे जाण्यास मनाई आहे. अनेक ठिकाणी या भिंती दुप्पट, तिप्पट आणि काही ठिकाणी चौपट रुंदीच्या आहेत. हे सर्व भाग एकमेकांवर बांधलेले आहेत. बीजिंगमध्ये आपण ज्या प्राचीन वास्तू पाहतो, त्यापैकी काही चीनच्या ग्रेट वॉलचा भाग होत्या.

भिंतीच्या आत मृतदेह पुरलेत

अशा अनेक अफवा पसरवल्या जातात की, या भिंतीचं काम करताना शेकडो कामगार याखाली गाडले गेले आहेत. अनेक मृतदेह या भिंतीत पुरल्याचं म्हटलं जातं. हान राजवटीतील प्रसिद्ध इतिहासकार सिमा कियान यांच्यामुळे या मिथकाचा उगम झाल्याचं इतिहासकारांचं मत आहे. या भिंतीच्या आत कुठेही मानवी हाडं आढळलेली नाहीत. शिवाय याचा पुरातत्त्वीय किंवा लेखी पुरावाही नाही. हे पूर्णपणे असत्य असल्याचं निष्पन्न झाले आहे.

मंगोलांना दूर ठेवण्यासाठी बांधली भिंत

इसवी सन पूर्व 210 मध्ये मरण पावलेल्या पहिल्या सम्राटाने या भिंतीचं बांधकाम सुरू केलं. इसवी सन 800 नंतर इतिहासात मंगोलांचं अस्तित्व आढळून येतं. 14 व्या शतकाच्या अखेरीस चिनी आणि मंगोल यांच्यात संघर्ष सुरू झाला. मिंग राजघराण्याने त्यावेळी मंगोल लोकांना चीनमधून हाकलून लावलं होतं.

मार्को पोलोने या ठिकाणाला भेट दिली होती

मार्को पोलो (व्हेनेशियन प्रवासी, लेखक, व्यापारी) याने या ठिकाणाला भेट दिल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. मार्को पोलोने बीजिंग ते कुबला खानच्या राजवाड्यापर्यंत अनेकवेळा प्रवास केला असला तरी ही भिंत पाहण्यात त्याने कधीच रस दाखवला नाही. त्यामुळे त्यांनी या भिंतीला भेट दिली, असं म्हणणं विश्वासार्ह वाटत नाही. 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनवर मंगोल लोकांचं राज्य होतं. चंगेजखानने उत्तर चीनवर आक्रमण केल्यावर ही भिंत पाडली.

Back to top button