तोंडात घास भरवून मुंग्यांचे संदेशवहन | पुढारी

तोंडात घास भरवून मुंग्यांचे संदेशवहन

जिनिव्हा : माणसाप्रमाणेच मुंग्यांचेही एक सोशल नेटवर्क असते. माणूस पोस्ट आणि कमेंटस्च्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण करतो तर मुंग्या एकमेकींच्या तोंडात घास भरवून माहितीची देवाण-घेवाण करतात!

स्वित्झर्लंडमधील फ्रिबोर्ग युनिव्हर्सिटीतील अ‍ॅड्रिया लीबौफ यांनी सांगितले की बहुतांश कीटकांमध्ये ‘तीन पोटं’ असतात. फोरगट, मिडगट आणि हाईंडगट अशी त्यांची नावे. मात्र, सामाजिक जीवन जगणार्‍या कीटकांमध्ये ‘फोरगट’ किंवा पहिल्या टप्प्यातील पोटाचा वापर ‘सोशल स्टमक’सारखाच होतो. मधल्या व शेवटच्या पोटातील अन्न हे पचवले जाते. मात्र, फोरगट या पहिल्या पोटातील अन्न हे संदेशवहनासाठी वापरले जाते. मुंग्यांसारख्या अनेक सामाजिक प्रजातींमध्ये अशा पोटातील अन्न दुसर्‍या जीवाच्या मुखात भरवून अशी माहितीची देवाण-घेवाण केली जाते. या क्रियेला ‘ट्रोफॅलॅक्सिस’ असे म्हटले जाते.

या क्रियेत एका जीवाच्या ‘सोशल स्टमक’मधील पोषक घटक व प्रोटिन दुसर्‍या जीवाच्या ‘सोशल स्टमक’ मध्ये जातात. अशी अनेक जीवांमध्ये देवाण-घेवाण होऊन एक सामाजिक साखळीच तयार होत जाते. त्यामुळे वसाहतीमधील प्रत्येक जीव एकमेकांशी जोडला जातो. विशेषतः ‘कार्पेंटर अँटस्’ या प्रजातीमधील मुंग्या असे करीत असतात. एका मिनिटात त्यांच्यामध्ये अशा वीस क्रिया घडत असतानाही दिसून येतात.

Back to top button