इंटरनॅशनल रोमिंगचे बिल चक्क 11 कोटी 95 लाख! | पुढारी

इंटरनॅशनल रोमिंगचे बिल चक्क 11 कोटी 95 लाख!

नवी दिल्ली : विदेशात पर्यटन करत असताना बरीच काळजी घ्यावी लागते. जवळपास प्रत्येक बाबतीत सतर्क रहावे लागते. बाहेर कसे फिरायचे, हवामानाप्रमाणे कपड्यांचे पॅकिंग, खाण्यापिण्याच्या वस्तू, जवळ किती रोख रक्कम ठेवायची, या सर्वांचा यात प्राधान्याने समावेश होतो. अगदी यातील छोटी गोष्ट विसरली तरी त्याचा बराच फटका बसू शकतो आणि याचाच प्रत्यय विदेशात इंटरनॅशनल रोमिंगमध्ये मोबाईल डाटा वापरणार्‍या एका भारतीय दाम्पत्याला आला.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे हा किस्सा घडला. हे जोडपे पर्यटनासाठी युरोपला गेले होते, पण मायदेशी परतल्यानंतर फोनचे बिल पाहता त्यांच्या पायाखालची जणू वाळूच घसरली. या जोडप्याने विदेशात इंटरनॅशनल रोमिंगमध्ये इंटरनेट वापरण्याची चूक केली आणि याचा त्यांना मोठा फटका सोसावा लागला.

विदेशातील पर्यटन संपवून मायदेशात परतल्यानंतर त्यांच्या मोबाईल कंपनीने 1 लाख 43 हजार 442.74 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 11 कोटी 95 लाख रुपयांचे बिल पाठवले आणि या जोडप्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. आश्चर्य म्हणजे हे जोडपे मागील 30 वर्षांपासून आता ज्या कंपनीने बिल पाठवले, त्याचेच ग्राहक राहिले आहेत.

विदेशात जाण्यापूर्वी त्यांनी कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला, त्यावेळी प्लॅन कव्हर असल्याने फारसा खर्च येणार नाही, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र अव्वाच्या सव्वा बिलामुळे या जोडप्याच्या चेेहर्‍याचा रंगच उडाला. या जोडप्याचे म्हणणे असे आहे की, तीन आठवड्यांच्या त्या विदेश दौर्‍यात त्यांनी केवळ साडेनऊ जीबी डाटा वापरला, पण तरीही इतके बिल आल्याने या जोडप्याने आता कंपनीविरोधात दाद मागण्याचे ठरवले आहे.

Back to top button