जपानचे ‘स्लिम’ लँडर निघाले भलतेच टिकाऊ! | पुढारी

जपानचे ‘स्लिम’ लँडर निघाले भलतेच टिकाऊ!

टोकियो : जपानच्या मून मिशनने आता नवे यश मिळवले आहे. जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीच्या माहितीनुसार त्यांच्या मून स्नायपर लँडरने तिसर्‍यांदा अडथळ्यांचा यशस्वी सामना केला आहे. चंद्रावरील दीर्घकालीन थंड रात्रीत टिकून राहून हे लँडर दिवस उजाडताच पुन्हा काम करू लागले आहे. विशेष म्हणजे त्याचे डिझाईन अशा कठीण स्थितीला सहन करण्यासाठी डिझाईन केलेले नव्हते. तरीही हे स्नायपर लँडर अद्यापही चंद्रावर सक्रिय आहे.

‘नासा’च्या माहितीनुसार चंद्रावरील एक रात्र पृथ्वीवरील चौदा दिवसांइतकी असते व या काळात तेथील तापमान शून्यापासून 133 अंश सेल्सिअस खाली घसरते. अशा थंड रात्री मून स्नायपर एक रात्रही टिकणार नाही, असे यापूर्वी वाटत होते. मात्र ‘स्लिम’ नावाचे हे लँडर अद्यापही टिकून आहे व सक्रियही आहे. ते 19 जानेवारीला चांद्रभूमीवर उतरले होते. त्यावेळी हे यश मिळवणारा जपान हा रशिया, अमेरिका, चीन व भारतानंतरचा पाचवा देश बनला होता.

लँडर उतरताच त्याचे सौर पॅनेल सरळ उभे राहण्याऐवजी पश्चिमेकडे झुकले. त्यामुळे वीजनिर्मिती करण्यासाठी त्याला पुरेशी सौरऊर्जा मिळत नव्हती. हे लँडर यशस्वीरित्या उतरले तरी काहीच काम करू शकणार नाही, अशी भीती त्यावेळी वाटू लागली होती; मात्र कालांतराने लँडरचे पॅनेल योग्य दिशेने झाले व ते काम करू लागले. त्यामुळे हे लँडर एक रात्र तरी टिकेल याची शाश्वती नव्हती. हे लँडर चंद्राच्या भूमध्यरेषेजवळील शियोली क्रेटरजवळ उतरले आहे. हे ठिकाण ट्रँक्विलिटीच्या 322 किलोमीटर अंतरावर आहे.

आता 23 एप्रिलला लँडर चंद्रावरील दीर्घ अशा तिसर्‍या रात्रीच्या थंड अंधःकारातून बाहेर येऊन पुन्हा काम करू लागले आहे. तेथील दिवसाचे तापमानही 121 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे दिवसाची भीषण उष्णता आणि रात्रीची भीषण थंडी या सर्वांवर ‘स्लिम’ने मात केली आहे!

Back to top button